जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा
सातारा -भारतात १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर हा आठवडा ‘जागतिक वारसा सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहाची सुरुवात यंदा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने देशभरातील आपल्या ३८०० हून अधिक संरक्षित स्मारकांवर १९ नोव्हेंबरला मोफत प्रवेश देऊन केली. यामध्ये ताजमहालपासून ते दिल्लीचा लालकिल्ला, कुतुबमिनार, अजिंठा-वेरूळपर्यंत यांचा समावेश होता. लोकांनी भारतातील वारशाजवळ जाऊन त्याची माहिती घ्यावी हा त्यामागील उद्देश होता. असा हा वारसा म्हणजे भूतकाळाचा बोजा नसून भविष्याची शिदोरी आहे.
साताराचा विचार करता या जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने आपण अजिंक्यतारा किल्ल्यांपासून कास पठारापर्यंत आपला वारसा जपायला हवा. पण प्रश्न असा आहे की, वारसा सप्ताह फक्त एक आठवडा साजरा करून संपतो का? वारसा म्हणजे काय? वारसा म्हणजे फक्त जुने किल्ले, मंदिरे, वाडे, विहिरी, एवढेच आहे का? तर नाही. वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवलेली प्रत्येक गोष्ट. ती इमारतही असू शकते, एक गाणेही असू शकते, एक सणही असू शकतो, एक भाषा, एक बोली, एक शेतीची पद्धत सगळा वारसाच आहे.
युनेस्कोनुसार मूर्त आणि अमूर्त वारसा असे याचे दोन प्रकार आहेत. मूर्त म्हणजे डोळ्यांनी दिसणारा ज्यात किल्ला, मंदिर, राजवाडा, लेणी, पूल येतात. अमूर्त म्हणजे दिसत नसला तरी जाणवणारा ज्यात लोकगीते, नाटक, कीर्तन, भारुड, ओव्या, सण, खाद्यसंस्कृती येते. सातारा जिल्हा हा या दोन्ही वारशांनी समृद्ध आहे. म्हणूनच जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने साताऱ्याचा वारसा समजून घेणे महत्वाचे आहे. सातारा अजिंक्यतारा, सज्जनगड, यवतेश्वर, जरंडेश्वर, चंदन-वंदन, पाटेश्वर, माहुली या सात टेकड्यांच्या कुशीत सातारा वसलेले असून कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम माहुली येथे होतो.
साताऱ्याचा इतिहास सातवाहन, मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, शिलाहार यांच्यापासून सुरू होतो. इ.स.पूर्व २०० मध्ये कराड येथे सापडलेल्या शिलालेखांवरून येथे प्राचीन वस्ती असल्याचे सिद्ध होते. पण मराठा काळात साताऱ्याला खरी ओळख मिळाली. १६६३ मध्ये छत्रपती शिवरायांनी सातारा आणि परळी किल्ला जिंकला. १७०८ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यात आपली गादी स्थापन केली. तेव्हापासून सातारा स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे पेशवाई, इंग्रज, स्वातंत्र्यलढा या प्रत्येक टप्प्यावर साताऱ्याने देशाच्या इतिहासात आपले नाव कोरले. १९४२ च्या चळवळीत साताऱ्यात प्रतिसरकार स्थापन झाले होते. क्रांतिसिंह नाना पाटील, किसन वीर यांसारख्या नेत्यांनी साताऱ्यातून इंग्रजांना आव्हान दिले. म्हणून सातारा किल्ल्यांच्या जिल्ह्याबरोबर क्रांतीचा जिल्हा आहे.
तर चला जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील काही वारसा स्थळांचा आढावा घेऊ.
१. अजिंक्यतारा किल्ला :
हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बाराव्या शतकात बांधला. नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी १६९८ मध्ये हा किल्ला जिंकून त्याला ‘अजिंक्यतारा’ नाव दिले. येथून संपूर्ण सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते. या किल्ल्यावर गडदेवता मंगळाई देवीचे ठाणे असून गडावर आजही जुन्या वास्तू आपल्या पराक्रमाच्या खुणा आपल्या अंगाखांद्यावर मिरवत आहे. या गडाचे प्रवेशद्वार आजही सुस्थितीत असून त्यावरील कोरीव नक्षीकाम पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. सकाळी फिरायला जाणाऱ्या साताऱ्याच्या लोकांसाठी हा किल्ला म्हणजे रोजचा श्वास आहे. पण पर्यटकांसाठी तो इतिहासाची पाठ्यपुस्तक आहे.
२. सज्जनगड
सज्जनगड म्हणजे पूर्वीचा परळी किल्ला. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी तो जिंकला. समर्थ रामदास यांनी येथेच ‘दासबोध’ हा ग्रंथ लिहिला, येथेच त्यांनी देह ठेवला. त्यांची समाधी आजही येथे आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. २३० पायऱ्या चढून गेल्यावर मिळणारे दर्शन आणि समोर पसरलेला साताऱ्याचा परिसर पाहिला की, मन शांत होते. सज्जनगड हा अध्यात्म आणि इतिहास यांचा संगम आहे.
३. प्रतापगड
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील प्रतापगड. १६५९ मध्ये याच गडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची ऐतिहासिक भेट झाली. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता. आज प्रतापगडावर भवानीमातेचे मंदिर आहे, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान दिले आहे. प्रतापगड त्यातला एक आहे. त्यामुळे प्रतापगड आता केवळ महाराष्ट्राचा नाही, तर जगाचा वारसा झाला आहे.
४. वाई
वाई हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले मंदिरांचे गाव असून येथे शंभरहून अधिक मंदिरे आहेत. महागणपती मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिर, लक्ष्मी-नारायण मंदिर प्रत्येक मंदिर हे पेशवेकालीन स्थापत्याचा नमुना आहे. वाईच्या घाटावर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. वाईच्या घाटावर उभे राहिले की, नदी, मंदिरे, घाट, दीपमाळा – हे सगळे पहायला मिळते त्यामुळे ते एक वारसाचित्र आहे.
५. बारामोटेची विहीर
बारामोटेची विहीर साताऱ्याजवळील लिंब गावाजवळ असून सोळाव्या शतकातील ही विहीर स्थापत्याचा चमत्कार आहे. बारा मोटांनी पाणी उपसले जात असे, म्हणून बारामोटी. या विहिरीच्या आत दगडी कोरीव काम, कमानी, खोल्या आहेत. पाणी काढण्यासाठी एवढी सुंदर वास्तू बांधणे, ही आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी होती. पाणी आणि स्थापत्य यांचा असा संगम दुर्मिळ आहे.
६. क्षेत्र माहुली
कृष्णा-वेण्णा संगमावर वसलेले क्षेत्र माहुली हे ठिकाण असून येथे छत्रपती शाहू महाराज व महाराणी ताराबाईंची समाधी आहे. तसेच काशीविश्वेश्वर, रामेश्वर, बिल्वेश्वर यांसारखी जुनी मंदिरे आहेत. माहुली हे श्रद्धा आणि इतिहास दोन्ही जपणारे ठिकाण आहे. राज्य सरकारने आता अजिंक्यतारा आणि माहुली येथील समाधीस्थळांचे जतन आणि जिर्णोद्धार करण्याची घोषणा केली आहे.
७. कास पठार
कास पठार हे युनेस्कोने २०१२ मध्ये पश्चिम घाटासोबत जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. ऑगस्टच्या शेवटी ते ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत या पठारावर ८५० हून अधिक प्रकारची रानफुले फुलतात. काही फुले तर जगात फक्त इथेच आढळतात. पण या पठारावर पर्यटकांची गर्दी, प्लास्टिक, फुले तोडणे यामुळे धोका निर्माण झाला आहे. वारसा सप्ताहाच्या निमित्ताने आपण कास पठाराला आणखी चांगले कसे बनवता येईल याचा विचार केला पाहिजे.
याशिवाय ठोसेघर, वजराई धबधबा, महाबळेश्वरचे महाबळेश्वर मंदिर, पाचगणी, औंधचे यमाईदेवी मंदिर, फलटणचा राजवाडा, कराडचा प्रीतीसंगम, कटगुणचे महात्मा फुले यांचे जन्मगाव, नायगाव सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव ही सर्व साताऱ्याच्या वारशाची पाने आहेत. कटगुण आणि नायगाव येथे तर केवळ स्मारके नसून क्रांतिकारी विचारांचे केंद्र व्हावीत, अशी अपेक्षा आहे.
साताऱ्याचा वारसा फक्त किल्ल्यांत नसून तो साताऱ्याच्या कंदी पेढ्यात आणि सैनिकी परंपरेतही आहे. ब्रिटिश काळापासून आजपर्यंत येथील हजारो तरुणांनी भारतीय लष्करात सेवा केली आहे. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये साताऱ्याचे अनेक जवान आहेत. प्रत्येक गावात एक तरी माजीसैनिक ही परंपरा हाच साताऱ्याचा जिवंत वारसा आहे. साताऱ्याच्या शाहिरी, पोवाडे, भारुडे, कीर्तन, तमाशा, लावणी या लोककला हाही वारसा आहे. पण टीव्ही आणि मोबाईलच्या जमान्यात या कला मागे पडत आहेत. या वारसा सप्ताहात आपण या कलाकारांना व्यासपीठ दिले पाहिजे. साताऱ्याची खाद्यसंस्कृतीही वारसाच आहे. साताऱ्याचा कंदी पेढा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, वाईची भाजीभाकरी, कराडची मिसळ या सगळ्यात त्या त्या मातीचा स्वाद आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग मिळाला असून हाही वारसाच आहे.
आज या वारशाच्या ठिकाणी दुर्लक्ष, अतिक्रमण आणि चुकीच्या ‘विकासा’चा शाप मिळालेला दिसतो. येथील अनेक किल्ल्यांवर प्रेमी युगुलांची नावे कोरलेली दिसतात. प्लास्टिकच्या बाटल्या फेकल्या जातात, भिंतींवर जाहिराती लिहिल्या जातात. अनेक जुन्या वाड्यांची पडझड झाली आहे. अनेक विहिरी बुजवल्या गेल्या आहेत. अनेक मंदिरांवर सिमेंटचा थर चढवून त्यांचे मूळ सौंदर्य नष्ट केले गेले आहे. काही ठिकाणी तर वारसा जपण्याच्या नावाखालीच वारसा नष्ट केला जातो. जुन्या दगडी मंदिरावर टाईल्स लावणे, जुन्या किल्ल्यावर सिमेंटचे बांधकाम करणे, ही जतन नाही तर विद्रुपीकरण आहे. जतन म्हणजे मूळ रूप टिकवणे. त्यासाठी तज्ज्ञांची, पुरातत्व विभागाची मदत घ्यायला हवी.
आणखी एक धोका म्हणजे आपल्या तरुण पिढीला वारशाबद्दल काहीही वाटत नाही. आपण आपल्या मुलांना आपल्या गावातला वाडा, विहीर, मंदिर दाखवत नाही. आपण त्यांना परदेशातील किल्ल्यांचे फोटो दाखवतो, पण आपल्याजवळच्या अजिंक्यताऱ्यावर घेऊन जात नाही. वारसा जपायचा असेल तर तो आधी घरातून आणि शाळेतून सुरू व्हायला हवा. वारसा जपणे हे फक्त सरकारचे किंवा पुरातत्व विभागाचे काम नसून ते आपलेही काम आहे. जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने आपण काही सोप्या गोष्टी करू शकतो.
आपल्या जवळच्या वारसास्थळाला भेट देऊन तिथल्या स्थानिक माणसाकडून किंवा अभ्यासकाकडून माहिती जाणून घ्या. शाळा-महाविद्यालयांनी वारसा सहली काढल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचा इतिहास लिहावा. गावातील जुनी माणसे, जुनी घरे, जुनी मंदिरे यांची माहिती गोळा करावी. तोच खरा इतिहासाचा अभ्यास आहे. वारसास्थळे कचरा न करता स्वच्छ ठेवली पाहिजेत. स्थानिक कलाकार, कारागीर यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून त्यांनी बनविलेल्या वस्तू विकत घ्या. म्हणजे त्यांची कला पर्यायाने त्यांचा वारसा जिवंत राहील. सोशल मीडियावर आपल्या जवळच्या वारशाबद्दल एक चांगला फोटो, अभ्यासपूर्ण माहिती पाठविल्याने वारसा जपला जातो.
वारसा ही आपल्या सातारची ओळख आहे. त्यात शिवरायांचे शौर्य, समर्थांचे तत्त्वज्ञान, शाहू महाराजांची राजनिती, महाराणी ताराबाईंचे धैर्य, फुले दांपत्याचे विचार, सैनिकांचे बलिदान आणि कासच्या फुलांचे सौंदर्य आहे. जागतिक वारसा सप्ताह हा आपल्याला आठवण करून देतो की, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जे जपले, ते आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी जपायला हवे. नाहीतर पुढची पिढी आपल्याला विचारेल कि तुम्ही आमच्यासाठी काय ठेवले? म्हणूनच आजच्या या सप्ताहात एक संकल्प करूया. आपल्या गावातील, आपल्या शहरातील एकातरी वारसास्थळ दत्तक घेऊन त्याची माहिती गोळा करूया, त्याची स्वच्छता करूया आणि ते सर्व मिडीयाच्या माध्यमातून सर्वांना सांगूया.
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर
९९७५७५९३२५



