Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » अदानीला झटका! साताऱ्यातील प्रकल्पाचे काम थांबविण्याची नोटीस

अदानीला झटका! साताऱ्यातील प्रकल्पाचे काम थांबविण्याची नोटीस

अदानीला झटका! साताऱ्यातील प्रकल्पाचे काम थांबविण्याची नोटीस

सातारा -सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यापर्यंत हातपाय पसरलेल्या अदानी समूहाच्या कारनाम्यांच्या विरोधात जनतेतून उठाव झाल्यानंतर वन विभागाला जाग आली आहे. शासन यंत्रणेला धाब्यावर बसवून अदानी समूहाकडून सातारा जिह्यात तारळी पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाचे काम राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची कसलीही परवानगी न घेता बिनबोभाट सुरू असल्याचा साक्षात्कार वन विभागाला दीड वर्षानंतर झाला आहे. याप्रकरणी आता वन विभागाने तारळी प्रकल्प व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवण्यास सांगितले आहे.

पाटण तालुक्यातील तारळी धरणावर अदानी समूहाकडून गेल्या दीड वर्षापासून तारळी पम्प्ड स्टोरेज प्रोजेक्टचे काम सुरू आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी न घेता कोणालाही न जुमानता हे काम रेटून सुरू आहे. हे काम करताना जैवविविधतेने समृद्ध आणि संवेदनशील असलेल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात प्रचंड मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी याप्रकरणी 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान कार्यालय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, जनमानसातून या विरोधात मोठा उठाव झाला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘सह्याद्री वाचवा’ मोहीम हाती घेण्यात आली असून, त्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी प्राप्त नसतानाही प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे. त्यामुळे सक्षम प्राधिकाऱ्यांची व राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची रीतसर पूर्वपरवानगी प्राप्त होईपर्यंत या प्रकल्पाचे सुरू असलेले सर्व प्रकारचे कामकाज तत्काळ थांबवण्यात यावे, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची पूर्वपरवानगी नसताना या प्रकल्पाचे काम कोणत्या अधिकारात व कशाच्या आधारे सुरू केले याचा खुलासा नोटीस प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत करावा, प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात वृक्षतोड करण्यासाठी परवानगी घेण्यात आली आहे का? असल्यास, किती झाडांच्या तोडीची परवानगी घेतली आहे याबाबतची कागदपत्रे सादर करावेत, असे आदेश या नोटिशीत दिले आहेत. ही नोटीस 13 नोव्हेंबर रोजीची असल्याचे आज समोर आले.

मंजुरी मिळवताना अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने प्रकल्पाची किंमत 5 हजार 675 कोटी इतकी दाखवली होती. वन्यजीव प्राधिकरणाने प्रकल्पाच्या 4 टक्के म्हणजे 227 कोटी रुपये विभागाकडे जमा करण्याचे निर्देश कंपनीला दिले होते. यादरम्यान कंपनीने चलाखी करून प्रकल्पाची किंमत केवळ 56.75 कोटी रुपये दाखवली. त्याआधारे सरकारी तिजोरीत भरावी लागणारी रक्कम 99 टक्क्यांनी कमी होऊन 227 कोटींऐवजी फक्त 2.27 कोटी इतकी झाली. त्यामुळे सरकारच्या जवळपास सवादोनशे कोटी रुपयांच्या महसुलाला चुना लागला.

पाटण वनपरिक्षेत्र कार्यालयाने यासंदर्भात तारळी पम्प्ड स्टोरेज प्रोजेक्टला कारणे दाखवा नोटीस बजावली असून प्रकल्पाचे काम थांबवण्यास व वृक्षतोड तसेच इतर वैधानिक परवानगीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अदानीला झटका! साताऱ्यातील प्रकल्पाचे काम थांबविण्याची नोटीस

अदानीला झटका! साताऱ्यातील प्रकल्पाचे काम थांबविण्याची नोटीस सातारा -सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यापर्यंत हातपाय पसरलेल्या अदानी समूहाच्या कारनाम्यांच्या विरोधात जनतेतून उठाव झाल्यानंतर वन

Live Cricket