बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची महाबळेश्वर तालुक्यातील भेकवली गावाला भेट
घरकुल लाभार्थ्यांचा सन्मान; आदिवासी बांधवांशी साधला संवाद
सातारा : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महाबळेश्वर तालुक्यातील भेकवली गावाला भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत त्यांनी चर्चा केली.
यावेळी प्रधानमंत्री आवास योजना तसेच विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून या योजनेतून झालेल्या लाभाची माहिती जाणून घेतली.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, निवारा, रोजगार आणि मूलभूत सुविधांशी संबंधित शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शासनाच्या योजनांपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष भर दिला जाईल. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या भेटीतून जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या गरजा आणि अपेक्षा जाणून घेतल्या. शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला या भेटीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले.



