भाजपच्या ‘आंगण मिलन सेवा’ अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांचा सत्कार
महाबळेश्वर प्रतिनिधी : भाजपच्या ‘आंगण मिलन सेवा’ अभियानांतर्गत महाबळेश्वर शहराच्या अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रमांक १३५ तसेच भेकवली, शिंदोळा व माचुतर येथील अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
भाजप महिला जिल्हा चिटणीस वृषाली डोईफोडे, महाबळेश्वर तालुका अध्यक्षा सीमा तोडकर तसेच भाजप पदाधिकारी, पालक, नागरिक, शिक्षिका आणि अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी स्मिता पवार, उषा ढाणक आणि शशिकला केळघणे यांच्या अंगणवाडीमध्ये विशेष मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाला भेट देण्यात आली. यावेळी पालक, शिक्षिका आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विशेष मुलांनी उपस्थितांचे शिस्तबद्ध व आनंदी वातावरणात स्वागत केले.
कार्यक्रमास भाजप महाबळेश्वर शहराध्यक्षा प्रीती कदम, वनिता गोळे, वनिता सेट्टी, मनीषा कदम यांच्यासह लाभार्थी महिला, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी व पालक तसेच संबंधित बूथमधील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपचे तालुका पदाधिकारी गजानन फळणे यांनी सहकार्य केले. अंगणवाडी सेविकांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.




