वाई तालुक्यातील वरखडवाडीच्या सृष्टी जाधवची आंतरराष्ट्रीय तलवारबाजीत कांस्य भरारी घेत दैदीप्यमान यश थायलंडमधील स्पर्धेत भारताला पदक
वाई प्रतिनिधी (संजीव वरे )-थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत वरखडवाडी (ता. वाई) येथील कु. सृष्टी ज्ञानेश्वर जाधव हिने महिला तलवारबाजीच्या ईपी प्रकारात कांस्यपदक पटकावून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सांघिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देणारी सृष्टी ही सातारा जिल्ह्यातील पहिली कन्या ठरली आहे. तिच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.
सृष्टीच्या बालपणीच वडिलांचे निधन झाले. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत आईने कष्ट करून तिचे संगोपन केले. मामानेही तिच्या शिक्षणासह क्रीडा कारकिर्दीसाठी आधार दिला. अनेक अडचणींवर मात करत सृष्टीने तलवारबाजीच्या सरावावर लक्ष केंद्रित केले. राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे प्रशिक्षक प्रफुल्ल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तिने नियमित सराव आणि प्रशिक्षण घेत मेहनत, जिद्द व सातत्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविले.
सृष्टीने यापूर्वी ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत कांस्य, सीनियर नॅशनल स्पर्धेत कांस्य, तर सीनियर स्टेट स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. सध्या अमरावती येथे सुरू असलेल्या ज्युनिअर स्टेट स्पर्धेतही तिने रौप्यपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे तिच्या पदकांची यशस्वी मालिका सुरूच आहे.
सृष्टीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वरखडवाडी येथे झाले. त्यानंतर तिने किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय, वाई येथे शिक्षण घेतले. सध्या ती पुणे येथील भारती विद्यापीठात शिक्षण घेत आहे.तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून सृष्टीचे कौतुक होत आहे.





