गोकुळ सत्तासंघर्ष! महायुतीचे राजेश पाटील अध्यक्ष
कोल्हापूर – देशभरात चर्चेतील आणि संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सह दुध उत्पादक संघ (गोकुळ) मध्ये अध्यक्ष निवडीत अखेर मागील दाराने महायुतीचे राजेश नरसिंह पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
समविचारी आघाडीची सत्ता येऊ नये यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका पत्रावरून शासन नियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन, महायुतीने १३ विरुद्ध १६ मतांनी ठरल्याप्रमाणे डाव साधला. दरम्यान, या चार शासन नियुक्त संचालकांना मतदान करण्यास समविचारी आघाडीकडून हरकत घेतली असता ती मान्य करण्यात आली नाही.
न्यायालयाने पंचवीस संचालकांना सात दिवसांत नोटीस पाठवून अध्यक्ष निवडीच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.पण शासन नियुक्त चार संचालकांना रात्रीच नोटीस देण्यात आली. त्यावरून त्यांना मतदान करू देऊ नये, तसेच न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे अशी मागणी समविचारी आघाडी – कडून अध्यासी अधिकारी तथा करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्याकडे करण्यात आली.
गोकुळ दूध संघांच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू महाराज समविचारी आघाडीचे १३ संचालक विजयी झाले.तर महायुती आघाडीचे १२ संचालक विजयी झाले. २५ संचालकांपैकी १४ संचालकांची कोरमसाठी आवश्यकता असताना, महायुतीचे १२ संचालक जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले. त्यामुळे अध्यासी अधिका-यांनी कोरम अभावी बैठक तहकूब केली होती.त्यानंतर समविचारी आघाडीने थोड्या वेळातच पुन्हा बैठक घेऊन, उपस्थित १३ संचालकांमधून शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली.हि निवड वैध ठरविण्यासाठी कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये धाव घेतली.यावर सुनावणी होऊन, १० नोव्हेंबर रोजी संचालकांची बैठक घेण्यासह सर्व २५ संचालकांना सात दिवसांत बैठकीसंदर्भात नोटीस देण्याचे निर्देश दिले होते.
या कालावधीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका पत्रावरून मंत्रीमंडळाची बैठक होऊन, ५०० कोटी पेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर पाच शासन नियुक्त संचालक नियुक्त करण्यासह चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अध्यादेशावर राज्यपालांची लागलीच मंजुरीही घेण्यात आली. महायुती सरकारच्या या निर्णयावर सर्वत्र टिकेची झोड उडाली. कोल्हापुरात विराट मोर्चा काढून, महायुती सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
दरम्यान न्यायालयाच्या निर्देशानुसार आज सोमवार, दि.१० नोव्हेंबर रोजी गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रशासकीय इमारतीत सकाळी ११ च्या सुमारास अध्यासी अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नियुक्त संचालक यांच्या उपस्थितीत बैठक पार पाडली.
यावेळी समविचारीचे संचालक अभिजीत तायशेटे, बयाजी शेळके आणि किसन चौगले यांनी शासन नियुक्त चार संचालकांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला.त्यावर अध्यासी अधिकारी यांनी दि.९ नोव्हेंबर चा उच्च न्यायालयाचे आदेश,तसेच जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि सरकारी अभियोक्ता यांचे उच्च न्यायालयाच्या आदेशा वरील स्पष्टीकरण देऊन,शासन नियुक्त संचालकांना या सभेस उपस्थित राहण्याबाबत नोटीसीद्वारे कळविण्यात आल्याचे स्पष्ट करुन,उच्च न्यायालयाच्या दि.२ नोव्हेंबर रोजीच्या आदेशाप्रमाणे हि सभा होत असल्याचे स्पष्ट केले.
सर्व संचालक मंडळ या सभेस उपस्थित असल्याने सभेची गणपूर्ती पूर्ण झाल्याचे घोषित केल्यानंतर अध्यक्ष पदासाठी महायुतीकडुन राजेश नरसिंह पाटील आणि समविचारी आघाडीकडून शशिकांत आनंदराव पाटील-चुयेकर यांचे अर्ज दाखल झाले.या दोन उमेदवारांसाठी गुप्त मतदान पद्धतीने मतदान प्रक्रिया घेण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या (सर्कीट बेंच) च्या आदेशानुसार निवडून आलेले संचालक व शासन नियुक्त संचालक यांनी नोंदविलेल्या मताबाबत स्वतंत्रपणे मतमोजणी करण्यात आली. याप्रमाणे एकूण २९ संचालकांपैकी राजेश पाटील यांना एकूण १६ मते तर शशिकांत पाटील-चुयेकर यांना एकूण १३ मते मिळाल्यामुळे अध्यासी अधिकारी यांनी राजेश पाटील यांची गोकुळ च्या चेअरमनपदी निवड झाल्याचे जाहीर केले.करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करवीरचे प्रेम राठोड तसेच गोकूळ चे कार्यकारी संचालक गोडबोले, प्रदीप पाटील, किर्तीराज घाटगे, गुरुप्रसाद जाधव आणि गजानन कुरणे हे उपस्थित होते.
गोकुळ दूध संघांच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अध्यक्ष निवडणुकीसाठी वापरलेल्या मतपत्रिका,नामनिर्देशनपत्रे, तसेच निवडीशी संबंधित कागदपत्रे सिलबंद पेटीमध्ये जिल्हा कोषागार कार्यालयात सुरक्षेत ठेवण्यात आल्याचे अध्यासी अधिकारी तथा करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी सांगितले.



