महाएफ्टिकॉन 2026: फार्मसी शिक्षक सक्षमीकरणासाठी राज्यस्तरीय भव्य परिषद
सातारा : असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI) महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने “Empowering Educators: Elevating Pharmacy Profession” या प्रभावी संकल्पनेवर आधारित महाएफ्टिकॉन २०२६ ही राज्यस्तरीय एकदिवसीय परिषद व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. राज्यातील फार्मसी शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणणारी ही परिषद फार्मसी शिक्षकांसाठी, शिक्षकांद्वारे आणि शिक्षकांची अशी अद्वितीय संकल्पना घेऊन प्रथमच महाराष्ट्रात साकार होत आहे. त्यामुळे फार्मसी शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह, नवे तंत्रज्ञान आणि अध्यापनातील आधुनिक पद्धती यावर सखोल चर्चा घडवून आणण्याचा या परिषदेत प्रयत्न होणार आहे.
असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI) ही देशातील फार्मसी शिक्षकांची अग्रगण्य राष्ट्रीय संस्था असून तिची स्थापना सन १९६६ मध्ये प्रा. एम. एल. श्रॉफ आणि प्रा. जी. पी. श्रीवास्तव यांसारख्या दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञांनी केली. फार्मसी शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे, संशोधनाला चालना देणे, नवतंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी शिक्षकांना सक्षम बनवणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशभरातील हजारो फार्मसी शिक्षकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देत संस्था शिक्षण, संशोधन व उद्योग क्षेत्रातील दुवा म्हणून कार्यरत आहे.
एपीटीआय महाराष्ट्र राज्य शाखा ही देशातील सर्वाधिक सक्रिय आणि गतिमान शाखांपैकी एक मानली जाते. सन २०२२ पासून विद्यमान कार्यकारिणीने शिक्षक-केंद्रित उपक्रमांना विशेष गती दिली असून राज्यातील विविध भागांतील २० कार्यकारिणी सदस्यांचा समावेश करून सर्वसमावेशकता व प्रादेशिक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्याचा गौरव म्हणून शाखेला “Best Branch Award 2023” तसेच “Most Contributing Branch Award 2025” असे राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाले आहेत.
शाखेच्या वतीने फार्मसी शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. क्षमता विकास मंच, फार्मा व्हॉइस मासिक, महिला मंच, सदस्यता अभियान, प्रादेशिक समन्वय उपक्रम तसेच “APTI Maharashtra at Your Door Steps” या विशेष मोहिमेद्वारे राज्यातील विविध फार्मसी महाविद्यालयांमध्ये संवादात्मक सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमांचा परिपाक म्हणून मघ सारस्वर-एष्टिकॉन २०२६ ही परिषद आयोजित करण्यात येत असून ती फार्मसी शिक्षण क्षेत्रातील नळे दिशादर्शन ठरणार आहे.
परिषदेच्या माध्यमातून फार्मसी शिक्षकांचे शैक्षणिक, संशोधन व नेतृत्व कौशल्य वृद्धिंगत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. उद्योग आणि अकादमिक क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी विशेष पॅनल चर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल टूल्स, आधुनिक अध्यापन पद्धती, नवसंशोधन, पेटंट आणि स्टार्टअप संस्कृती या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धती, परिणामकारक मूल्यांकन तंत्र आणि अनुभवकथनाद्वारे ज्ञानविनिमय यांनाही परिषदेत विशेष स्थान दिले जाणार आहे.
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिप्रेक्ष्यात फार्मसी शिक्षणासमोर नवी आव्हाने उभी राहत आहेत. रुग्णसेवा अधिक परिणामकारक बनविणे, औषधोपचारातील त्रुटी कमी करणे आणि औषधनिर्मिती व वितरण प्रक्रियेत गुणवत्ता वाढविणे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य ठरत आहे. या पार्श्वभूमीवर फार्मसी शिक्षकांना सतत अद्ययावत ठेवणे, संशोधनाधारित अध्यापन पद्धती आत्मसात करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषी दृष्टिकोन विकसित करणे ही काळाची गरज बनली आहे. या सर्व मुद्द्यांवर परिषदेत सखोल चर्चा होऊन शिक्षकांना नवे मार्गदर्शन मिळणार आहे.
या परिषदेत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळाही पार पडणार असून संशोधन, अध्यापन, प्रशासन, सामाजिक योगदान आणि संस्थात्मक उत्कृष्टता या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमुळे राज्यातील गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन मिळून शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
एकूणच महाएफ्टिकॉन २०२६ ही परिषद महाराष्ट्रातील फार्मसी शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल. फार्मसी शिक्षकांना नव्या उंचीवर नेण्याबरोबरच शिक्षण-संशोधन उद्योग या तिन्ही क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील सर्व फार्मसी शिक्षक, संशोधक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एपीटीआय महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.




