साताऱ्यात खत खरेदी आता मोबाईलवरून! एफएफएस प्रणाली सुरू; रांगांचा त्रास होणार कमी भाग्यश्री फरांदे यांची माहिती; वाढेफाटा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये खत बुकिंगचा शुभारंभ
सातारा, दि. २३ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची सुलभ, पारदर्शक आणि गरजेनुसार उपलब्धता करून देण्यासाठी फार्मवर्क फॉर फर्टिलायझर्स सेल्स (एफएफएस) प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे खतांची माहिती घेऊन घरबसल्या खतांचे बुकिंग करता येणार आहे. परिणामी, खत खरेदीसाठी दुकानांमध्ये आणि वितरण केंद्रांवर लागणाऱ्या रांगा कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्गालगत वाढेफाटा, सातारा येथील मोरे फर्टिलायझर्समध्ये एफएफएस प्रणालीद्वारे खत बुकिंगचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे, कृषी अधिकारी विजय निकम, मोरे फर्टिलायझर्सचे सुरेश मोरे आणि दीपक गाडे उपस्थित होते.
मोबाईलवरून करता येणार खतांचे बुकिंग
भाग्यश्री फरांदे म्हणाल्या की, शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून एफएफएस ॲप डाउनलोड करून त्यामध्ये लॉगिन करावे. आधार क्रमांक किंवा फार्मर आयडीच्या माध्यमातून लॉगिन केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या नोंदणीकृत सर्वे क्रमांकांची आणि क्षेत्राची माहिती उपलब्ध होईल. त्यानंतर शेतजमीन निवडून पिकाची माहिती व आवश्यक खताचे प्रमाण नोंदवता येईल. उपलब्ध खत असलेल्या विक्रेत्यांच्या यादीतून शेतकऱ्यांना आपल्या सोयीनुसार विक्रेत्याची निवड करता येणार आहे.
खत बुकिंगच्या व्यवहारासाठी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या क्यूआर कोडची वैधता ७२ तासांची असेल. त्यामुळे बुकिंगनंतर निर्धारित कालावधीत व्यवहार पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे.
काळाबाजार आणि खतांच्या गैरवापराला बसणार आळा
पिकाचा प्रकार आणि लागवडीखालील क्षेत्र यानुसार आवश्यक खताची मागणी नोंदविण्याची सुविधा या प्रणालीत उपलब्ध आहे. त्यामुळे गरजेपुरतेच खत उपलब्ध करून देण्यास मदत होईल. तसेच खतांची लिंकिंग, काळाबाजार आणि शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या युरियाच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यास या प्रणालीचा उपयोग होणार आहे.
डिजिटल पद्धतीने खत बुकिंग आणि विक्रेत्याची निवड करता येणार असल्याने खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एफएफएस प्रणालीचा वापर करून रासायनिक खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



