शिवरायांच्या गडकोटांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आजच्या तरुणाईवर : श्री.गणेश शिंदे
सातारा -शिवकालीन गडकिल्ले जाज्वल राष्ट्रप्रेमाचे आणि मराठी अस्मितेचे प्रतिक असून अशा इतिहासाचे साक्ष देणारे गडकोट, मंदिरे आणि पर्यावरण यांचे जतन आणि संवर्धन आपण केले पाहिजे. अशा या दैदिप्यमान इतिहासाचा वसा व वारसा जपण्याची जबाबदारी आजच्या महाविद्यालयीन तरुणाईवर आहे, असे प्रतिपादन दुर्गनाद ट्रेकर्स अँड एडवेंचर्सचे संस्थापक आणि इतिहास अभ्यासक श्री.गणेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुं.अक्षदा चव्हाण यांनी केले तर पाहुण्यांची ओळख कु. हर्षदा जाधव हिने करून दिली.
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर राष्ट्रीय सेवा योजनेच्या तळीये गावात आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात ‘गडकिल्ले व पर्यावरण’ या विषयावर ते बोलत होते. श्री.शिंदे पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रातील गडकिल्ले हे मराठ्यांच्या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार आहेत. छत्रपती शिवरायांनी गडकिल्ल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक नवे किल्ले उभारले तसेच जुन्या किल्ल्यांची डागडुजी केली. महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैली, गोमुखी प्रवेशद्वार ही असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातील गडकोटांची आणि मंदिरांची ओळख करून घेतली पाहिजे.
ते पुढे म्हणाले कि आज कित्येक गडावरील प्रवेशद्वारे, देवड्या, जंग्या, पाण्याची टाके, चुन्याचे घाणे, विरगळ, सतीशीळा आणि गड अवशेष काळाच्या ओघात नष्ट होऊ लागलेले आहेत. आज साताऱ्यातील प्रत्येक गडकोटांच्यासाठी संवर्धन करणारी संस्था असली तरी आपण त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता, प्लास्टिक निर्मुलन करून सर्वधनाच्या कार्यास हातभार लावून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा ऐतिहासिक वारसा असणारे गडकोट आणि त्यावरील वास्तूंचे तसेच पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. गडाच्या जवळील मेटे, चर्या, जंग्या, दुहेरी तटबंदी, माची, नेढे, गोमुखी दरवाजा, बुरुंज, बालेकिल्ला, गडदेवता, विरगळ, सतीशीळा, अंबरखाना, राजसदर या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत तरच आपल्याला गडकोट व्यवस्थित समजतील.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.नेहा निकम हिने तर आभार प्रदर्शन कु.नंदिनी मोरे केले. सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. कमलसिंग क्षत्रिय, डॉ.संध्या पौडमल, डॉ.उत्तम आळतेकर,सहा.प्रा. सुर्यकांत अदाटे तसेच तळीये ग्रामस्थ व रा.से.यो. स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.




