लाईट नाही म्हणून टाक्या रिकाम्या”-शाहूनगरवासीयांचा पाण्यासाठी आक्रोश!जय सोशल फाऊंडेशनकडून खासदार उदयनराजेंना निवेदन; तातडीने तोडगा काढण्याची मागणी
सातारा (अली मुजावर)सातारा : शाहूनगर, जगतापवाडी परिसरातील नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून पाण्याच्या विस्कळीत पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जय सोशल फाऊंडेशन, शाहूनगर तर्फे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले.
संस्थापक सागर भोसले (सर) यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले असून, पाण्याची समस्या तातडीने मार्गी लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.फाऊंडेशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “शाहूनगर परिसरातील जवळपास सर्वच कॉलन्यांमध्ये पाणीपुरवठा अनियमित व विस्कळीत आहे. पंपिंग स्टेशनला वीज नसल्यामुळे टाक्या भरल्या नाहीत — हेच कारण जीवन प्राधिकरणाकडून वारंवार दिले जाते. मात्र, नागरिकांची सहा महिन्यांपासून सुरू असलेली गैरसोय लक्षात घेतली जात नाही.”
तसेच, “एमएसईबीकडे प्रस्ताव पाठवला असून लवकरच वीजपुरवठा सुरू होईल” अशी केवळ आश्वासने मिळत आहेत. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही,” असेही भोसले यांनी स्पष्ट केले.
या विषयाला “अतितातडीचा” मानून जीवन प्राधिकरण आणि एमएसईबी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे निर्माण झालेला प्रश्न खासदार उदयनराजेंच्या माध्यमातून तातडीने सोडवावा, अशी जय सोशल फाऊंडेशनची मागणी आहे.
शाहूनगर भागातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत “फाऊंडेशनने आमच्या आवाजाला दिशा दिली” अशी भावना व्यक्त केली.




