सातारा जिल्ह्यातील दुर्गामाता
निसर्गाचा वरदहस्त लाभलेला सातारा जिल्हा प्राचीन मंदिरे, पुरातन वास्तू, विविध गड किल्ले यांनी नटलेला आहेच पण याशिवाय सातारा जिल्ह्यात असणारी देवींचीपुरातन मंदिरे त्याचबरोबर हि मंदिरे शक्तीपिठे म्हणून नेहमीच सर्वानाआकर्षित करत राहिलेली आहेत. विशेष करून नवरात्रीत या देवींच्या मंदिराला भेट देणे हि एक आनंदाची पर्वणीच असते.सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा देवतांचा सहवास राहिलेला असून समाजाला प्रेरणा देण्याचे काम अशा मंदिरांनी केलेले आहे. सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील या देवींचा आणि मंदिर परिसर यांचा परिचय करून देण्यासाठी या नवरात्रीत मी प्रा. सुर्यकांत अदाटे घेऊन येत आहे ‘सातारा जिल्ह्यातील दुर्गामाता’ हे नवीन सदर.
आपल्याकडे वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या करण्यात येतात. यापैकी दोन गुप्त नवरात्र असून चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे नऊ दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी हा चांगला कालावधीमानण्यात येतो. शरद ऋतुच्या सुरूवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्रौत्सव असे म्हटले जाते.
सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ असतो. त्यामुळे शेतकरी हा उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत असतो. या काळात या देवींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने सातारा परिसरातील महिला भक्तगण जातात. शारदीय नवरात्रौत्सवामध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ देवींच्या रूपांची पूजाअर्चा करण्यात येते. तर दहाव्या दिवशी रावणदहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसरा दिवस असतो तो ब्रम्हचारिणी देवीचा, तिसरा दिवस चंद्रघटा देवीचा मानण्यात येतो तर चौथा दिवस कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. पाचवा दिवस स्कंदमाता देवी, सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा, सातवा दिवस हा कालरात्री देवीसाठी, आठव्या दिवशी महागौरी देवी आणि नववा दिवस हा सिद्धिदात्री देवीच्या पूजनाचा दिवस मानला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करून विधीनुसार पूजा करण्यत येते.
नवरात्र नक्की कसे साजरे करण्यात येऊ लागले याच्या दोन पौराणिक कथा सांगण्यात येतात. त्यातील पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासुर नावाचा एक दैत्य ब्रम्हदेवाचा भक्त होता. त्याने ब्रम्हदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव अथवा देव अथवा दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही असे वरदान त्याला ब्रम्हदेवाने दिले. पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुर माजला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर हाहाःकार माजवायला सुरूवात केली.
महिषासुरची दहशत सगळीकडे पसरू लागली. त्याचा वध करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेला साकडे घातले. नऊ दिवस दुर्गा देवीने महिषासुराशी लढून त्याचा दहाव्या दिवशी वध केला. म्हणूनच तिला ‘महिषासुर मर्दिनी’ असेही म्हणतात. यानंतरच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. नऊ दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टींशी लढा देण्यासाठीच नवरात्रौत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे पुराणात सांगितले जाते.
तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार, श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. नऊ दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होतो. त्यानंतर देवीने लंकाविजयचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात येते. तर दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला.
‘सातारा जिल्ह्यातील दुर्गामाता’ हे सदर लिहिताना मी सातारा जिल्ह्यातील दुर्गामाता देवी, त्यांची मंदिरे, मंदिराची रचना, देवीची आख्यायिका यांची ओळख करून दिलेली आहे. त्यामुळे नवरात्रीय देवीची इत्यंभूत माहिती महिलांना तर मिळेलच पण त्याबरोबरच शालेय मुले-मुली आणि युवक युवतींना हे सदर निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल. देवीदर्शनाच्या माध्यमातुन आपला इतिहास, भूगोल, संस्कृती यांचे प्रतिबिंब त्यांना पाहता येईल. हे सदर लिहिताना त्या-त्या ठिकाणी भटकंती करून तिथेपर्यंत कसे पोहोचायचे तसेच मंदिराचा इतिहास देण्याचा अभ्यासपूर्वक प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल असा विश्वास मला आहे.

प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५




