गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा -श्री.उत्तर चिदंबरम् नटराज मंदिर आयोजित ” गणेश नृत्य संगीत महोत्सव” निमित्त, रविवार दिनांक २०/०९/२०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ‘नृत्यांजली नृत्य संस्थेच्या विदयार्थीनींनी भरतनाट्यम् नृत्यातून विविध रचना सादर केल्या. गुरु वैशाली पारसनीस यांच्या ज्येष्ठ शिष्या अनुजा बोकील, मृण्मयी मेहंदळे , मयंका जोशी आणि तनिष्का रेवले यांनी “नृत्य विनायक” या कार्यक्रमात श्री गणेशावर , शिव शक्ती वर आधारीत रचलेल्या विविध रचना सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात अष्टदिग्पलांना वंदन करणारी शुद्ध नर्तनाची पुष्पांजली ही रचना सादर झाली.
त्या नंतर उपनिषदांच्या तात्त्विक आणि आध्यात्मिक विचारधारेत खोलवर रुजलेली गणपती तालम ही भगवान गणेशाला समर्पित पारंपरिक संस्कृत स्तोत्ररचना सादर झाली.
त्याच्या सहज, वेगवान तालबद्ध लयीला समर्पक अश्या नृत्य संरचनेमुळे रचनेचे वैशिष्ट्य अधिकच खुलून आले. या नंतर भरतनाट्यम मार्गम मधील शब्दम् या नृत्य प्रकारातून भगवान श्री गणेशाला वंदन करून त्याची स्तुतीपर रचना सादर झाली . सर्व गणांचा अधिपती, कलांचा आधार, भगवान शिवाचा पुत्र आणि चंद्रकोर धारण करणाऱ्या शिवाचा सुत असलेल्या गणेशाचे स्मरण करून, त्याच्याकडे आपल्या रक्षणाची प्रार्थना करण्यात आली.
या नंतर प्रसिद्ध गणेश कीर्तनं श्री विघ्नराजम भजे या रचनेतून भक्ती, गणेशाचे तेज व ऐश्वर्य, त्यांची विघ्नहर्ता म्हणून असलेली शक्ती, भक्तांवरील कृपा आणि ज्ञान-मुक्ती देणारे स्वरूप हे भाव ठळकपणे व्यक्त केले गेले.
सादरीकरणातील पुढची रचना शिव-शक्तीच्या चिरंतन ऐक्याचे नृत्यमय प्रतीक दर्शवणारे अर्धनारीश्वर स्तोत्रावर आधारित नृत्य सादरीकरण झाले. शिवाचे तांडव, वैराग्य, सामर्थ्य आणि पार्वतीचे लास्य, सौंदर्य, करुणा यांच्या सुंदर संगमाचीच अनुभूती या नृत्याच्या सादरीकरणातून प्रकर्षाने जाणवली. भगवान शिवाच्या नटराज स्वरूपातील तांडव नृत्याचे सुंदर वर्णन असलेली पुढील रचना महाराजा स्वाती तिरुनाळ रचित “शंकर श्रीगिरिनाथ प्रभो” ही रचना सादर झाली .
भगवान शिवांच्या अद्भुत तांडवनृत्याचे, त्यांच्या दिव्य रूपाचे आणि त्यांच्या विश्वव्यापी शक्तीचे भक्तिभावाने केलेले स्तवन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता पारंपरिक तिल्लाना या रचनेचे सादरीकरण करून झाले.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री शिरीष चिटणीस यांच्या हस्ते नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संचालिका गुरु. सौ. वैशाली पारसनीस यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नृत्य कलाकारांना प्रशस्ती पत्रक देऊन श्री उत्तर चिदंबरमच्या आयोजकांनी प्रोत्साहन दिले. साताऱ्यातील रसिक प्रेक्षकांनी , मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. मंजिरी जोशी ह्यांनी केले.




