२६/११ च्या शूरवीरांना महाबळेश्वरकरांचे अभिवादन; शहर शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
महाबळेश्वर (प्रतिनिधी):२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर जवानांना महाबळेश्वर येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाबळेश्वर शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि गोल्डन मित्र मंडळ, हनुमान मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हर्षद गालींदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते आणि उपस्थितांच्या साक्षीने शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शांतता पाळून शहिदांना मानवंदना दिली.
शौर्य आणि बलिदान सदैव प्रेरणादायी
२६/११ च्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांसह पोलीस व सुरक्षा दलातील वीर जवानांनी अतुलनीय शौर्य गाजवत सर्वोच्च बलिदान दिले. देशवासीयांच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेली प्राणांची आहुती देश कधीही विसरणार नाही. त्यांचे हे शौर्य, त्याग आणि देशभक्ती भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या श्रद्धांजली कार्यक्रमास हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर कुंभारदरे, माजी नगराध्यक्ष प्रभाकर देवकर, शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, उपशहरप्रमुख राजेश साळवी, शंकर ढेबे, ज्येष्ठ नेते सुरेश अप्पा साळुंखे, रमेश भाऊ शिंदे, महेश अण्णा पलोड, प्रमोद शेटे, अशोक शिंदे, युवासेना संघटक आकाश साळुंखे, उस्मानभाई खरखंडे, शहानवाजभाई खरखंडे, मनोज ताथवडेकर, अलीभाई वारुणकर, आसिफभाई महापुळे, अमोल साळुंखे, प्रशांत मोरे, संजय ढेबे, सागर चिकणे, अमर सरतापे, अर्बन बँकेचे संचालक जावेदभाई वलगे, रंजीत तांबे आदी उपस्थित होते.
तसेच जिल्हा संघटिका सुजाता मोरे, शिल्पा ठक्कर, वसुधा बगाडे, पौर्णिमा मोहिते, दत्ताभाऊ बावळेकर, अंकुश उलालकर, पत्रकार प्रेषित गांधी, राजेश सोंडकर, संदीप देवकुळे, रियाजभाई शेख, निलेश केळगणे, जितेश कुंभारदरे, सतीश साळुंखे, चेतन फळणे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, स्थानिक नागरिक आणि पर्यटक उपस्थित राहून त्यांनी शहिदांना विनम्र अभिवादन केले.




