मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ दुचाकी वाहनांसाठी एम एच ११ इ डी नवीन मालिका सुरु जर्मनीतील उद्योगांनी महाराष्ट्रात उत्पादनासह संशोधन आणि विकास केंद्र उभारावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा – मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी शिक्षक हाच समाज आणि विद्यार्थी घडविणारा सर्वांत महत्त्वाचा घटक : शिरीष चिटणीस शिक्षकांचा एल्गार : ऑनलाइन व अशैक्षणिक कामांवर बहिष्कार साताऱ्यातून पाठिंबा; जिल्हाध्यक्ष किरण यादव यांची माहिती
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शिक्षक हाच समाज आणि विद्यार्थी घडविणारा सर्वांत महत्त्वाचा घटक : शिरीष चिटणीस

शिक्षक हाच समाज आणि विद्यार्थी घडविणारा सर्वांत महत्त्वाचा घटक : शिरीष चिटणीस

शिक्षक हाच समाज आणि विद्यार्थी घडविणारा सर्वांत महत्त्वाचा घटक : शिरीष चिटणीस

साताऱ्यातील ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थेच्या लोकमंगल हायस्कूल-शाहूपुरी शाळेचे मुख्याध्यापक शांताराम पवार यांचा ३० वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर सेवापूर्ती सोहळ्यात कृतज्ञतापूर्वक गौरव; माजी विद्यार्थी, सहकारी, मान्यवर आणि कुटुंबीयांकडून आठवणींना उजाळा

सातारा-शाळांमधील विद्यार्थिसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना आणि शिक्षकांमधील उत्साहही काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र दिसत असताना शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे महत्त्व अधिक अधोरेखित होण्याची गरज आहे. युरोपसारख्या प्रगत देशांमध्ये समाज आणि विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षकाला सर्वोच्च स्थान दिले जाते. कारण शिक्षक हाच समाज आणि विद्यार्थी घडविणारा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे याची तेथील समाजाला आणि शासनाला जाणीव आहे.शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यापुरते शिक्षण न देता त्यांना स्वतःची आणि समाजाची प्रगती साधण्यास सक्षम बनविले पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले.

‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्था सातारा संचलित लोकमंगल हायस्कूल, गेंडामाळ, शाहूपुरी येथील मुख्याध्यापक शांताराम बाजीराव पवार यांच्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर आयोजित सेवापूर्ती सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी निकी बंट्स मल्टिपर्पज हॉल, मोळाचा ओढा, सातारा येथे हा समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.या प्रसंगी संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस, पंचायत समिती सातारा येथील विस्तार अधिकारी व माजी विद्यार्थी प्रशांत जाधव, ॲडव्होकेट व माजी विद्यार्थी प्रसाद लाटकर, नगरसेविका वनिता शिंदे, माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे, लावंघर ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना पवार, सनराईज ग्रुपचे संचालक राज शेख, मुख्याध्यापक विजय यादव, शशिकांत जमदाडे, कल्याण भोसले, अनिल सुर्वे, सतीश पवार,शांताराम पवार सर यांच्या कन्या स्मिता भोसले व संध्या भोईटे, शितल मोरे, सोनाली लेवे, गुरव सर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरीष चिटणीस पुढे म्हणाले, की शांताराम पवार सर यांनी आपल्या अध्यापनातून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या प्रतीक्षा क्षीरसागर या विद्यार्थिनीने पवार सरांच्या मार्गदर्शनामुळे सीए (चार्टर्ड अकाउंटंट) होण्यापर्यंत मजल मारली. अशा यशोगाथा शिक्षकांच्या कार्याचे खरे मूल्यमापन करणाऱ्या असतात. शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळविणे हा नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कर्तृत्व, सामाजिक जाणीव आणि प्रगतीची क्षमता निर्माण करणे हा आहे. पवार सर सेवेतून निवृत्त झाले असले, तरी त्यांनी आपला अनुभव आणि ज्ञान शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच नव्या शिक्षकांना वेळोवेळी देत राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, की सेवापूर्ती सत्कार हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर केलेल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा भावनिक सोहळा असतो. शांताराम पवार सर यांनी गेली ३० वर्षे संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीत मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष न देता त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच शाळेच्या प्रगतीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशा ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षकांचा सन्मान हा नव्या पिढीतील शिक्षकांसाठी प्रेरणादायी असतो. सेवानिवृत्ती हा त्यांच्या कार्याचा शेवट नसून नव्या पर्वाची सुरुवात आहे. त्यांचे मार्गदर्शन यापुढेही संस्थेला आणि शाळेला लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

पंचायत समिती सातारा येथील विस्तार अधिकारी आणि पवार सरांचे माजी विद्यार्थी प्रशांत जाधव यांनी आपल्या मनोगतात शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, की इंग्रजी हा विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा विषय पवार सर अत्यंत सोप्या आणि समजण्यास सुलभ पद्धतीने शिकवत असत. त्यामुळे विषयाची भीती दूर होऊन अभ्यासाची आवड निर्माण झाली. शिक्षकांनी दिलेले शिक्षण, शिस्त आणि संस्कार यांचाच आजच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर उपयोग होत आहे. शाळेत मिळालेल्या ज्ञानामुळे आणि शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांमुळेच आम्ही आज समाजात जबाबदारीने उभे राहू शकलो. पवार सरांच्या अध्यापनाचा आणि मार्गदर्शनाचा ठसा विद्यार्थ्यांच्या मनावर कायम राहील, असे सांगत त्यांनी सरांना उत्तम आरोग्य आणि आनंदी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

 

पवार सरांच्या कन्या स्मिता भोसले यांनी वडिलांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने भावना व्यक्त करताना सांगितले, की वडिलांनी ३० वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पित वृत्तीने शिक्षक म्हणून सेवा बजावली, याचा मुलगी म्हणून मनापासून अभिमान वाटतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य घडविले. स्वतःच्या कुटुंबाप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी घेणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आम्ही जवळून अनुभवले आहे. आता निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःच्या आवडीनिवडी, छंद, कुटुंब आणि आनंदासाठी अधिक वेळ द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

दुसऱ्या कन्या संध्या भोईटे यांनी वडिलांच्या शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, की पवार सरांचे वेळेचे नियोजन, कामातील शिस्त आणि प्रत्येक जबाबदारी पूर्ण करण्याची वृत्ती घरातील सर्वांसाठी आदर्श ठरली. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळविता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या आयुष्यातील ३० वर्षांची शैक्षणिक सेवा ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नसून एका नव्या सुंदर पर्वाची सुरुवात आहे. या पुढील आयुष्यात त्यांनी आनंदाने आणि समाधानाने जीवन जगावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

माजी विद्यार्थिनी आणि शिक्षिका शितल मोरे यांनी पवार सरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, की पवार सर हे संघर्षशील, संघटनकौशल्य असलेले आणि इतरांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. ज्या शाळेत विद्यार्थिनी म्हणून शिक्षण घेतले, त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी विशेष बाब आहे. या प्रवासात पवार सरांनी दिलेले प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले. त्यांनी दिलेले ज्ञान, अनुभव आणि संस्कार ही आयुष्यभर उपयोगी पडणारी शिदोरी आहे, असे त्यांनी नमूद केले.

 

माजी विद्यार्थिनी सोनाली लेवे यांनी शिक्षकाचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्थान स्पष्ट करताना सांगितले, की शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरणारा दीपस्तंभ असतो. शिक्षकांची शिस्त, योग्य वेळी केलेले मार्गदर्शन आणि कौतुकाचे दोन शब्द विद्यार्थ्यांना जीवनात योग्य दिशा देतात. शिक्षक शाळेतील दैनंदिन जबाबदाऱ्यांतून निवृत्त होतात; मात्र त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर केलेले संस्कार कधीच संपत नाहीत. पवार सरांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात निर्माण केलेला सकारात्मक बदल हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.

 

सनराईज ग्रुप, शाहूपुरीचे संचालक राज शेख यांनी पवार सरांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा उल्लेख केला. ते म्हणाले, की लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही पवार सरांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. स्वतःच्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी बी.ए. आणि बी.एड.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मुख्याध्यापक पदापर्यंत मजल मारली. गेली ३० वर्षे त्यांनी अखंड, प्रामाणिक आणि निष्ठेने शैक्षणिक सेवा केली. त्यांचा हा प्रवास नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. समाजोपयोगी उपक्रम राबविताना अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांचा सन्मान करणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

ॲडव्होकेट आणि माजी विद्यार्थी प्रसाद लाटकर यांनी पवार सरांच्या अध्यापनातील वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, की पवार सरांनी इंग्रजी विषयाच्या अध्यापनाबरोबरच शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी प्रयत्न केले. शिक्षण म्हणजे केवळ वर्गातील चार भिंतींमध्ये होणारा अभ्यास नसून मैदानावर मिळणारे शारीरिक शिक्षणही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासाला चालना देत असते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रीडा क्षेत्राला विशेष महत्त्व दिले. शिक्षकांचे समर्पण, त्याग आणि संस्कार यांच्यामुळेच समाज आणि देशाची जडणघडण होत असते, असे त्यांनी सांगितले.

 

गुरव सर यांनी ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना पवार सरांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांनी आपल्या कार्यातून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची तयारी आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव यामुळे ते शिक्षक, मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.

 

मुख्याध्यापक विजय यादव यांनी आपल्या मनोगतात हा कार्यक्रम निरोप समारंभ नसून स्नेहाचे ऋणानुबंध जपण्याचा आणि आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्याचा सोहळा असल्याचे सांगितले. पवार सरांनी आपल्या कामातून आणि कर्तृत्वातून मुख्याध्यापक पदाची प्रतिष्ठा वाढविली. विद्यार्थ्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करणे ही शिक्षकाची सर्वांत मोठी संपत्ती असते आणि ती संपत्ती पवार सरांनी आपल्या सेवाकाळात कमावली आहे. संस्थेच्या आणि शाळेच्या वाढीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सेवेतून निवृत्त झाले तरी त्यांनी शाळेशी असलेले नाते कायम ठेवून वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

सत्कारमूर्ती शांताराम बाजीराव पवार यांनी आपल्या मनोगतात ३० वर्षे ५ महिने ११ दिवसांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांसोबत घालविलेला काळ, सहकारी शिक्षकांचे सहकार्य, संस्थेने दाखविलेला विश्वास आणि शाळेच्या विकासासाठी केलेले प्रयत्न यांचा उल्लेख करताना ते भावुक झाले.

 

आपल्या सेवाकाळात कबड्डी या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून शिकविण्यावर आपला भर राहिला. गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकविणे आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य संधी मिळवून देणे हे आपल्या कामाचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते, असे त्यांनी नमूद केले.

 

संस्थेच्या अध्यक्षांनी दाखविलेला विश्वास, सचिवांचे मार्गदर्शन, सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामुळेच आपण आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकलो, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली. सेवेतून निवृत्त होत असलो तरी मनाने आपण कायम संस्थेशी, शाळेशी आणि विद्यार्थ्यांशी जोडलेले राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. रमेश महामुलकर आणि श्रीनाथ सावंत यांनी तबला व पेटीच्या साथीने सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कल्याण भोसले यांनी पवार सरांच्या शैक्षणिक आणि सेवाकार्याचा गौरव करणाऱ्या मानपत्राचे वाचन केले. यावेळी शांताराम पवार यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमास जितेंद्र टोणपे, यशवंत शिलवंत, नंदा पवार, उज्ज्वला कर्णवर, विपुल लोहार, जगदीश खंडागळे, दत्तात्रय शिर्के, संदीप भोसले यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि लावंघर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन गुलाब पठाण यांनी केले, तर राजेंद्र माने यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ

मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ वैद्यकीय उपचारांसाठी अधिक निधी उपलब्ध होण्यास

Live Cricket