वाई तालुक्यातील पश्चिम व पूर्व भागातील पिके वाळून खाक तरीही मंत्र्याचा तालुका दुष्काळ यादीत नाही… शेतकऱ्यात असंतोषची लाट
वाई तालुक्यात दुष्काळाची भीषण छाया; शेतकरी अडचणीत पण कागदावर सरासरी पाऊस ? शासनाच्या निकषावर प्रश्नचिन्ह.
वाई(संजीव वरे )- वाई तालुक्यात यंदा कागदोपत्री सरासरीएवढा पाऊस झाला असला, तरी प्रत्यक्षात शेतकरी तीव्र दुष्काळाच्या छायेत सापडले आहेत. खरीप हंगामातील सर्व पिके जळून खाक झाली असून, पश्चिम भागातील मुख्य भातपीक शेवटच्या घटका मोजत आहे. असे असतानाही शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीतून वाई तालुक्याचे नाव वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे धोम, बलकवडी आणि ही धरणे भरली खरी; परंतु जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत सरासरीएवढाही पाऊस पडला नाही. परिणामी, नोव्हेंबरडिसेंबरपर्यंत टिकणारे पाण्याचे तलाव सप्टेंबर महिन्यातच पूर्णपणे कोरडेठाक पडले आहेत. भुईमूग, घेवडा, चवळी आणि हायब्रीड पिके हाताशी न आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शासनाने दुष्काळ घोषित करण्यापूर्वी प्रशासनाने बांधावर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने नेमके कोणते निकष लावून तालुका दुष्काळमुक्त ठरवला, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
विशेष म्हणजे, वाई तालुक्याचे स्थानिक आमदार हे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री असूनही ते बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आपल्याच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना मंत्री महोदयांनी शासनासमोर वस्तुस्थिती का मांडली नाही, याबद्दल जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाई तालुक्याला तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळवून देणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील ३५६ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असताना, यंदा वाई आणि कोरेगाव या तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून का वगळण्यात आले? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. कागदावर सरासरी पाऊस दाखवून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हे शासन धोरण नेमके कशासाठी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.शासन निकषांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वाई तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला पाहिजे वाई तालुक्यात धरण उशाला कोरड घशाला अशी अवस्था आहे प्रशासनाने केलेल्या चुकीचे पंचनामे यामुळे सर्वसामान्य शेतकरी वाई तालुक्यात मेटाकुटीला आलेला आहे जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर दखल घेऊन वाई तालुका दुष्काळग्रस्त सादर करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयात केले जाईल -विक्रम वाघ जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मराठा महासंघ
वाई तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक भात असून गेल्या दोन महिन्यात दमदार पाऊस न झाल्यामुळे शेतकरी मोठया संकटात आला आहे तरी दुष्काळ यादीत समाविष्ट करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी -रवींद्र (अप्पा) भिलारे. नेते पश्चिम भाग वाई तालुका




