राज्यात निवडणुकीचा धुरळा उडणार; विधानपरिषदेच्या ३ पदवीधर व २ शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर
मुंबई- राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार असून निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये औरंगाबाद, पुणे, नागपूर विभाग पदवीधर तसेच अमरावती आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
राज्यात आता निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. महाराष्ट्रातील पाच विधानपरिषदेच्या जागेच्या निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. विधानपरिषदेतील रिक्त होणार्या जागांवर निवडणुका होणार आहेत. या विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया ही 29 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर 23 ऑक्टोबर रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. तर 27 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ५ जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आल्याने सर्व राजकीय पक्ष आता जोरदारपणे कामाला लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील पाच विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे सतिश चव्हाण, पुणे पदवीधार मतदारसंघात अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक, पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर हे प्रतिनिधित्व करत होते. या पाचही आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे रिक्त होणार्या पाच जागांवर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी लवकरच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची एकच धावाधाव पाहायला मिळेल. त्यामुळे कोणत्या जागेवरून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.





