महाबळेश्वरमध्ये पर्यटन वाढ आणि सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून हॉटेल व आस्थापना चालकांची आढावा बैठक; सायबर सुरक्षा आणि C-Form नोंदणीबाबत स्पष्ट सूचना
महाबळेश्वर(राजेश सोंडकर )-महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्यांतर्गत शहरातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व हॉटेल, लॉज, होम-स्टे, बंगले, रेस्टॉरंट, फार्म हाऊस व इतर आस्थापनांचे मालक, चालक तसेच मॅनेजर यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. आज, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:३० ते दुपारी १:४० या वेळेत वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुनील साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला परिसरातील सुमारे २८० ते ३०० व्यावसायिक आणि नागरिक उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये आस्थापनांचे परवाने, कामगार व पर्यटकांची सुरक्षितता, परकीय नागरिकांचे वास्तव्य आणि सायबर सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाकडून सविस्तर मार्गदर्शन करून खालीलप्रमाणे महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या:
▪️सायबर सुरक्षा आणि डिजिटल व्यवहार:सायबर पोलीस ठाणे, सातारा येथील सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) श्री. राजेश माळी यांनी ऑनलाईन बुकिंग वेबसाईट, डिजिटल व्यवहार, सोशल मीडियाचा वापर आणि ग्राहकांच्या डेटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आस्थापनांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत उपस्थितांना सतर्क करण्यात आले.
▪️C-Form नोंदणी व परकीय नागरिक: सातारा एफ.आर.ओ. (FRO) कार्यालयातील पोलीस हवालदार सचिन पवार यांनी परकीय नागरिकांच्या वास्तव्याबाबत ‘C-Form Registration’ वेळेत व नियमानुसार पूर्ण करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. परकीय नागरिक मुक्कामास आल्यास त्यांची ओळखपत्रे, पासपोर्ट व व्हिसाची तपासणी करून सर्व नोंदी अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
▪️कामगारांची पोलीस पडताळणी: आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आणि कायमचा पत्ता यांसारखी आवश्यक कागदपत्रे संकलित करून ठेवावीत. नवीन कामगारांची नियुक्ती करताना त्यांची माहिती पोलीस ठाण्याला उपलब्ध करून देणे आणि आवश्यकतेनुसार चारित्र्य पडताळणी (Police Verification) करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
▪️पर्यटकांची सुरक्षा व ओळखपत्र तपासणी: आस्थापनांमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची/पर्यटकाची योग्य नोंद ठेवून त्यांच्या मूळ ओळखपत्रांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
▪️संशयास्पद हालचालींवर लक्ष:परिसरामध्ये कोणतीही संशयास्पद व्यक्ती, अनधिकृत वस्तू किंवा हालचाल आढळल्यास स्वतः कोणताही निर्णय न घेता तत्काळ महाबळेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
▪️परवाने आणि कायदेशीर कागदपत्रे:आस्थापनांशी संबंधित सर्व शासकीय परवाने (Licenses) आणि कागदपत्रे मुदतीत नूतनीकरण करून वैध व अद्ययावत ठेवावीत.
▪️कायदा व सुव्यवस्था:आस्थापनांच्या आवारात कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य, वादविवाद किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रकार घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीच्या शेवटी, नियम व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला. बैठकीदरम्यान उपस्थित व्यावसायिक आणि मॅनेजर्सच्या विविध शंकांचे पोलीस अधिकाऱ्यांकडून निरसन करण्यात आले.




