बलकवडीचे सामाजिक व सहकार क्षेत्रातील तरुण कार्यकर्ते अशोक जाधव यांचे निधन
वाई (संजीव वरे) : बळकवडी, ता. वाई येथील सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अशोक लक्ष्मण जाधव (वय ५३) यांचे मुंबई येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने बलकवडीसह पश्चिम भाग वाई तालुक्यात शोककळा पसरली आहे.
अशोक जाधव हे न्यू इंग्लिश स्कूल, बोरगावचे माजी विद्यार्थी होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे घेतले. शिक्षणानंतर त्यांनी आपले संपूर्ण कार्यक्षेत्र प्रामुख्याने सहकार क्षेत्रात निर्माण केले. गुलप्रभा पतसंस्थेतून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. त्यानंतर ते ज्ञानसागर सहकारी पतसंस्थेत कार्यरत होते.
अशोक जाधव हे श्री काळेश्वरी देवस्थान ट्रस्टचे सचिव होते. तसेच कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळ, वरळी, मुंबई या मंडळाचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. श्री काळेश्वरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.
बलकवडी गावाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले. सामाजिक कार्यासोबतच राजकीय व सहकार क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांना नाट्यविषयाची विशेष आवड होती. मागील काही वर्षांपासून ते वारकरी संप्रदायाच्या कार्यातही सक्रियपणे सहभागी होते.
अशोक जाधव यांच्या निधनाचे वृत्त समजताच मंत्री मकरंद (आबा) पाटील, सभापती विक्रांत भैय्या डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, चंद्रकांत शेलार यांच्यासह वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कार्याला सर्वांनी अभिवादन केले.
सामाजिक, सहकार आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय असलेला एक तरुण कार्यकर्ता अकाली निघून गेल्याने बलकवडी ग्रामस्थांसह त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने विविध क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना व्यक्त होत आहे.




