दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे– पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि.24 :- माण, कोरेगाव व फलटण तालुक्यात या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक पाण्या अभावी करपून गेले आहे. शेतकऱ्यांनी खचून जावू नये. त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे असून तातडीने पिक नुकसानीची मदत केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी कोरेगाव, फलटण व माण तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतामधील पिकांची पहाणी केली. या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, एक ही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची सूचना प्रशासनाला देण्यात आलेली आहे. शासनाच्या सूचनेनुसारच आज मी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी करत आहे. प्रशासनाला पंचनामे करण्याबरोबरच अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
आज शेतकरी अडचणीत आहे त्यांना पुन्हा उभे करण्याचे काम शासन करीत आहे. तरी शेतकऱ्यांनी निराश न होता पुन्हा नव्या उमेदीने उभे राहावे शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिली.





