छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी मार्गावर दुर्गनादची ऐतिहासिक मोहीम फत्ते
१३ दुर्गप्रेमींची १० दिवसांत ३६०० किलोमीटरची दक्षिण दिग्विजय अभ्यास सहल
सातारा -छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे साक्षीदार असलेल्या दक्षिण भारतातील ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि सांस्कृतिक वारशाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने सातारा जिल्ह्यातील दुर्गनाद ट्रेकिंग ग्रुप व इतिहास संशोधन व ऐतिहासिक वारसा संवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच दक्षिण दिग्विजय अभ्याससहल यशस्वीरीत्या पार पडली. या मोहिमेत १३ दुर्गप्रेमींनी तब्बल १० दिवसांत सुमारे ३६०० किलोमीटरचा प्रवास करून दक्षिण भारतातील १३ किल्ले, १६ मंदिरे, ६ संग्रहालय आणि ६ ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे, छत्रपती राजाराम महाराज स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्या ऐतिहासिक मार्गाने जिंजीच्या दिशेने गेले, त्या मार्गाचा मागोवा घेणे आणि त्या प्रवासातील ऐतिहासिक ठिकाणांचा अभ्यास करणे हा या सहलीचा मुख्य उद्देश होता.
इतिहास केवळ पुस्तकांमधून वाचण्यापेक्षा त्या इतिहासाशी निगडित स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा भूगोल, स्थापत्यकला, ऐतिहासिक महत्त्व, सांस्कृतिक परंपरा आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती समजून घेता येते. याच विचारातून दुर्गनादच्या सदस्यांनी या अभ्याससहलीचे नियोजन केले होते. महाराष्ट्राच्या स्वराज्य इतिहासाचा दक्षिण भारताशी असलेला संबंध उलगडण्याचा हा एक अभिनव प्रयत्न ठरला. अशा प्रकारची राजाराम महाराजांच्या ऐतिहासिक मार्गावर आधारित अभ्यास सहल आयोजित करणारा दुर्गनाद हा सातारा जिल्ह्यातील पहिलाच ट्रेकिंग ग्रुप आहे.
या अभ्याससहलीची सुरुवात कारवार येथून झाली. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील कारवार या ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाणापासून झाली. त्यानंतर गोकर्ण महाबळेश्वर आणि मुरुडेश्वर येथील धार्मिक व सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करण्यात आला. गोकर्ण येथील प्राचीन महाबळेश्वर मंदिर आणि मुरुडेश्वर येथील भव्य शिवमूर्ती व मंदिरस्थापत्य, समुद्रकिनाऱ्याचे भौगोलिक महत्त्व आणि प्राचीन धार्मिक परंपरांची माहिती सदस्यांनी जाणून घेतली.
यानंतर सहल केळदीच्या दिशेने मार्गस्थ झाली. केळदी हे दक्षिण भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक केंद्र असून केळदी नायक घराण्याने या प्रदेशात महत्त्वपूर्ण राजकीय आणि सांस्कृतिक योगदान दिले. विशेषतः राणी चेन्नम्मा यांचे कार्य इतिहासात उल्लेखनीय आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी प्रवासाच्या इतिहासात केळदीच्या राजघराण्याचे विशेष स्थान आहे.
राजाराम महाराजांना दक्षिणेकडील प्रवासात केळदीच्या राणी चेन्नम्मा यांनी दिलेला आश्रय आणि सहकार्य हा मराठा इतिहासातील महत्त्वाचा प्रसंग आहे. या पार्श्वभूमीवर केळदीच्या रामेश्वर मंदिराला आणि संग्रहालयाला दिलेली भेट अभ्याससहलीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची ठरली.
त्यानंतर नगारा किल्ल्याला भेट देऊन तेथील ऐतिहासिक वास्तू आणि दुर्गरचनेचा अभ्यास करण्यात आला. दक्षिण भारतातील किल्ल्यांची रचना आणि महाराष्ट्रातील गडकोटांची रचना यांची तुलना करण्याची संधी या भेटींमधून मिळाली. त्यानंतर राजाराम महाराजांचे वास्तव्य असणाऱ्या आरमानी कोप्पा या घनदाट जंगलातील घराला भेट देण्यात आली.
यानंतर कर्नाटकातील होयसळ साम्राज्याच्या स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या हळेबिडूला भेट देऊन तेथील भारतीय शिल्पकलेचा अमूल्य ठेवा असलेल्या मंदिरांना भेट दिली. यात दगडांवर कोरलेल्या असंख्य मूर्ती, देवदेवतांची शिल्पे, नक्षीकाम आणि मंदिरांची रचना यांचा समावेश होता. या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याची भेट हा होता. मराठ्यांच्या इतिहासात जिंजीला अनन्यसाधारण महत्त्व असून छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्यावर मोठे संकट आले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याचे नेतृत्व स्वीकारून दक्षिण भारतातील जिंजी किल्ल्यावरून मोगलांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. जिंजीचा दुर्गम परिसर आणि भक्कम तटबंदी यामुळे हा किल्ला स्वराज्याच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. जिंजीचा किल्ला राजगिरी, कृष्णगिरी आणि चंद्रगिरी या तिन्ही किल्ल्यांचा संगम असून याची विस्तृत दुर्गव्यवस्था आहे. या किल्ल्यांच्या भेटीदरम्यान सदस्यांनी तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वारे, पाण्याची व्यवस्था, नैसर्गिक संरक्षण आणि डोंगररचनेचा अभ्यास केला. जिंजी किल्ल्याची भेट ही केवळ पर्यटनाची नव्हे, तर स्वराज्याच्या संघर्षमय इतिहासाशी जोडणारी भावनिक आणि अभ्यासपूर्ण अनुभूती आहे.
या मोहिमेत पुढे तंजावर येथील प्रसिद्ध बृहदीश्वर मंदिराला भेट देण्यात आली. हे मंदिर स्थापत्यकलेचा जागतिक स्तरावर गौरव करणारे भव्य स्मारक असून चोल राजवटीतील राजा राज चोल प्रथम याने अकराव्या शतकात याची निर्मिती केली. विशाल दगडी बांधकाम, उंच विमान, अप्रतिम शिल्पकला आणि मंदिराची भव्यता पाहून सहल सदस्यांना दक्षिण भारतीय स्थापत्यकलेची समृद्ध परंपरा अनुभवता आली.
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्वही सदस्यांनी जाणून घेतले. तंजावर आर्ट संग्रहालय, सरस्वती ग्रंथालय आणि तंजावरचे छत्रपती आबाजी भोसले महाराजांची व प्रिन्स प्रतापसिंहराजे यांची भेट घेऊन पुढे तिरुमयाम या किल्ल्याकडे कूच केले. तेथील भक्कम तटबंदी, प्रवेशद्वारे, संरक्षण व्यवस्था आणि डोंगरावरील किल्ल्याची रचना पाहिली.
बेल्लूर किल्ल्याजवळील लाजरा, साजिरा व गोजिरा हे शिवरायांनी बनविलेले किल्ले तसेच वेल्लोर किल्ल्यांना दिलेल्या भेटी यावेळी महत्वाच्या ठरल्या. यानंतर दक्षिण भारतातील रामेश्वरम आणि धनुष्कोडी या ठिकाणांनाही भेट देण्यात आली. रामेश्वरम हे भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असून येथील रामनाथस्वामी मंदिर प्रसिद्ध आहे. मंदिरातील भव्य सभामंडप, स्तंभयुक्त प्रदक्षिणा मार्ग, कलात्मक दगडी बांधकाम आणि धार्मिक परंपरा यांचा अभ्यास सदस्यांनी केला. भारताचे शेवटचे टोक असणारे धनुष्कोडी येथे समुद्राचे विलक्षण रूप आणि निसर्गाची भव्यता अनुभवता आली. भारताच्या दक्षिण टोकाजवळील या प्रदेशाला ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे. १९६४ मधील विनाशकारी चक्रीवादळामुळे धनुष्कोडी शहर उद्ध्वस्त झाले. आजही तेथील भग्न वास्तू त्या नैसर्गिक आपत्तीची साक्ष देतात. समुद्र, निसर्ग आणि इतिहास यांचा अनोखा संगम या ठिकाणी अनुभवायला मिळाला.
यानंतर मदुराई येथील मीनाक्षी अम्मन मंदिर हे दक्षिण भारतातील द्रविड स्थापत्यशैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण असून मंदिराची उंच गोपुरे, त्यावरील असंख्य रंगीत शिल्पे, भव्य प्रांगणे आणि कलात्मक रचना पाहून सदस्यांनी दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्याचा अभ्यास केला. त्यानंतर तिरुची येथील श्रीरंगम मंदिराला भेट देण्यात आली. कावेरी नदीच्या बेटावर वसलेले हे मंदिर भगवान विष्णूंच्या श्रीरंगनाथ स्वरूपाला समर्पित आहे. विशाल मंदिर परिसर, अनेक प्राकार, भव्य गोपुरे आणि प्राचीन धार्मिक परंपरा यामुळे श्रीरंगम मंदिराला विशेष महत्त्व आहे. या भेटीमुळे दक्षिण भारतातील धार्मिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य परंपरेची समृद्धता अनुभवता आली.
अभ्याससहलीच्या पुढील टप्प्यात धर्मपुरी, चित्रदुर्ग, होदेगिरी आणि दावणगिरी या भागांना भेट देण्यात आली. चित्रदुर्गचा किल्ला हा कर्नाटकातील प्रसिद्ध आणि अभेद्य मानल्या जाणाऱ्या किल्ल्यांपैकी एक आहे. अनेक डोंगररांगांमध्ये पसरलेली तटबंदी, एकापाठोपाठ एक असलेली प्रवेशद्वारे, बुरुज आणि नैसर्गिक संरक्षण व्यवस्था यामुळे हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. चित्रदुर्गच्या किल्ल्याचा इतिहास, तेथील राजवटी आणि युद्धपरंपरा यांची माहिती सदस्यांनी घेतली. होदेगिरी येथील शहाजीराजांची समाधी आणि दावणगिरी परिसरातील ऐतिहासिक स्थळांना भेट देत या सहलीची सांगता करण्यात आली. संपूर्ण प्रवासात कर्नाटक, तामिळनाडू व केरळ या तीन राज्यांतील ऐतिहासिक वारसा, भौगोलिक परिस्थिती, स्थानिक संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती आणि स्थापत्यकलेतील विविधता अनुभवण्याची संधी सदस्यांना मिळाली.
या दक्षिण दिग्विजय अभ्यास सहलीमध्ये दुर्गनाद ट्रेकिंगचे अध्यक्ष दुर्गअभ्यासक श्री. गणेश शिंदे, उपाध्यक्ष श्री.संतोष खामकर, अभिरक्षक श्री. प्रवीण शिंदे, मोडी लिप्यंतरकार घनश्याम ढाणे, प्रा. सूर्यकांत अदाटे, डॉ. दीपक निकम, श्री.बबन किर्दत, श्री. महेश कदम, डॉ. कल्याण पवार, कप्तान जितेंद्र कदम, श्री. प्रशांत साळुंखे, श्री.विकास कोरडे आणि श्री.बाबू पिटेकर या १३ सदस्यांचा सहभाग होता. या सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने दहा दिवसांचा प्रवास पूर्ण केला. सुमारे ३६०० किमीचे अंतर पार करताना प्रवासातील अडचणी, वेळेचे नियोजन, विविध ठिकाणांवरील अभ्यास आणि परस्पर सहकार्य या सर्व गोष्टींचा कस लागला. मात्र इतिहासाविषयीची आवड, दुर्गसंवर्धनाची भावना आणि स्वराज्याच्या इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची जिद्द यामुळे ही मोहीम यशस्वीपणे संपन्न झाली.
दुर्गनाद ट्रेकिंग ग्रुपचा हा उपक्रम केवळ पर्यटनापुरता मर्यादित नव्हता. छत्रपती राजाराम महाराजांच्या ऐतिहासिक प्रवासाचा मागोवा घेताना मराठ्यांच्या शौर्याची, दूरदृष्टीची, संघर्षाची आणि स्वराज्यनिष्ठेची ओळख नव्या पिढीला करून देणे हा या मोहिमेमागील प्रमुख हेतू होता. महाराष्ट्रातील गडकोटांचा इतिहास आणि दक्षिण भारतातील मराठा इतिहास यांच्यातील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न या सहलीतून करण्यात आला. आजच्या काळात अनेक ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित होत आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण, अस्वच्छता आणि संवर्धनाचा अभाव आहे. अशा वेळी इतिहासप्रेमींनी प्रत्यक्ष स्थळांना भेट देऊन त्यांची माहिती संकलित करणे, ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व समजून घेणे आणि समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे. दुर्गनादच्या या उपक्रमातून अशाच प्रकारचा सकारात्मक संदेश देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्याला शिवरायांच्या स्वराज्याचा समृद्ध वारसा लाभला आहे. गडकोटांच्या परंपरेतून प्रेरणा घेत दुर्गनाद ग्रुपने महाराष्ट्राबाहेरील ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करण्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. राजाराम महाराजांच्या पाऊलखुणांचा शोध घेत दुर्गनादच्या सदस्यांनी इतिहासाच्या पानांमधील अनेक संदर्भ प्रत्यक्ष अनुभवले. इतिहासाची आवड, दुर्गसंवर्धनाची प्रेरणा आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जबाबदारी या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम सातारा जिल्ह्यातील दुर्गप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या ऐतिहासिक अभ्याससहलीची संकल्पना दुर्गनादचे अध्यक्ष श्री. गणेश शिंदे, संस्थापक श्री.राहुल भोसले, सचिव सौ. सविता भोसले आणि खजिनदार सौ.सपना शिंदे यांची होती. त्याप्रमाणे दुर्गनादच्या मावळ्यांनी ही मोहीम फत्ते केली.




