Home » राज्य » शिक्षण » किसन वीर महाविद्यालय, वाई येथे ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

किसन वीर महाविद्यालय, वाई येथे ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

किसन वीर महाविद्यालय, वाई येथे ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे – भरत जाधव

वाई (संजीव वरे )जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथील NCC युनिटच्या आणि क्रीडा विभागाच्या वतीने *‘नशामुक्त भारत’* अभियानांतर्गत आयोजित जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी सातारा पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे भरत जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी व्यसनांचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट केले. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून आपल्या ऊर्जेचा उपयोग शिक्षण, क्रीडा, NCC, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवारात व समाजातही व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी युवकांची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले, “विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या हातात देशाच्या प्रगतीची दिशा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात ध्येय निश्चित करून शिक्षण, क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले पाहिजे. व्यसनांपासून दूर राहणे ही केवळ स्वतःची जबाबदारी नसून कुटुंब व समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे.”

ते पुढे म्हणाले, “नशामुक्त भारताची सुरुवात प्रत्येक व्यक्तीपासून झाली पाहिजे. चांगली संगत, सकारात्मक विचार आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांचा स्वीकार करून युवकांनी स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे. NCC आणि खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होते. त्यामुळे अशा जनजागृतीपर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन NCC अधिकारी क्रीडा संचालक मेजर डॉ. समीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी NCC कॅडेट्स, खेळाडू, विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून निरोगी, शिस्तबद्ध आणि जबाबदार जीवन जगण्याचा संदेश मिळाला; व्यसना पासून स्वतः दूर राहून इतरांनासुद्धा व्यसनांपासून दूर ठेवाण्याची शपथ घेण्यात आली.

       कार्यक्रमाच्या शेवटी ज्युनिअर अंडर ऑफिसर सानिका सुळके यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे भरत जाधव, अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, NCC अधिकारी मेजर डॉ. समीर पवार, प्रा. राहुल तायडे, प्रा. सुमित कोरडे, श्री दत्ता काळे शिक्षकवर्ग, NCC कॅडेट्स, खेळाडू व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.

“व्यसनाला नकार — उज्ज्वल भविष्याला होकार; नशामुक्त युवक — सशक्त समाज — समर्थ भारत!” या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड वाई : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वाई येथील वकील

Live Cricket