कष्टांच्या वाटेवर चालत माणुसकी जपणारे ‘नाना’
सातारा -रिक्षाचे स्टेअरिंग असो वा थिएटरचा ऑपरेटर रूम… कुटुंबासाठी आयुष्यभर कष्ट करणाऱ्या एका अवलियाची आज ६६ वर्षांच्या अविस्मरणीय जीवनप्रवासाचा सोहळा साजरा होत आहे.जीवनाच्या ६६ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास एका नव्या पर्वाच्या उंबरठ्यावर येत आहे.रतन मार्तंड खंडुझोडे… आप्तेष्टांच्या प्रेमाने आणि जिव्हाळ्याने ज्यांना सगळे ‘नाना’ म्हणून ओळखतात.
आयुष्याने त्यांच्यासमोर अनेकदा कठीण प्रसंग उभे केले; मात्र परिस्थितीसमोर त्यांनी कधीही हार मानली नाही. पडेल ते काम करायचे, प्रामाणिकपणे कष्ट करायचे आणि आपल्या कुटुंबाला सुखी ठेवायचे, एवढाच ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला.
साताऱ्यातील जुन्या राजलक्ष्मी थिएटरमध्ये थिएटर ऑपरेटर म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारीने काम केले. नोकरीच्या माध्यमातून संसाराचा गाडा ओढताना अनेक अडचणी आल्या, पण त्यांची पावले कधी थांबली नाहीत. निवृत्तीनंतरही त्यांनी स्वस्थ बसणे पसंत केले नाही. रिक्षाचे स्टेअरिंग हातात घेत पुन्हा कष्टाची वाट धरली.
स्वतःच्या सुखाचा विचार करण्यापेक्षा मुलांच्या भविष्याचा विचार करणाऱ्या नानांनी दोन मुलगे आणि दोन मुलींना शिक्षण दिले, त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. आपल्या मुलांनी आयुष्यात काहीतरी मोठे करावे, त्यांनी सुखी राहावे, यासाठी त्यांनी केलेला संघर्ष कदाचित शब्दांत मांडणेही कठीण आहे.
नानांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख मात्र त्यांच्या कष्टांइतकीच त्यांच्या माणुसकीत आहे. समाजातील गोरगरीब, गरजू व्यक्ती दिसली की आपल्या परीने मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची सवय आजही कायम आहे. स्वतःच्या परिस्थितीची पर्वा न करता दुसऱ्याच्या अडचणीत धावून जाणे, आपुलकीने विचारपूस करणे आणि नाती मनापासून जपणे, हीच त्यांची खरी श्रीमंती.
पैशाने श्रीमंत होणारे अनेक असतात; पण माणसांच्या मनात श्रीमंत होणारे फार कमी असतात. रतननाना खंडुझोडे यांनी आपल्या कष्टाने, साधेपणाने आणि प्रेमळ स्वभावाने अशीच माणसांची श्रीमंती कमावली आहे. अखंड ऊर्जेचा प्रेरणास्त्रोत त्यांच्याकडे आहे. सल्ला मसलतीसाठी अनेक पाहुण्यांचा त्यांच्याकडे रतिबा असतो.
आज ते ६६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मागे वळून पाहताना कष्टांनी भरलेली वाट दिसते; पण त्या वाटेवर आपल्या कुटुंबासाठी केलेला त्याग, मुलांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आप्तेष्टांनी दिलेले प्रेम हीच त्यांच्या आयुष्याची खरी कमाई आहे.
नाना, तुमच्या कष्टांना सलाम… तुमच्या माणुसकीला मनापासून नमन!६६ व्या वाढदिवसानिमित्त रतन मार्तंड खंडुझोडे ‘नाना’ यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समाधान आणि आनंदाचे असंख्य क्षण देवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.
संदीप खंडूझोडे




