‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’ची २५ ऑक्टोबरला रंगत; आरोग्य आणि आनंदाचा संदेश देणार

फलटण : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. नियमित व्यायामाची सवय लागावी आणि नागरिकांनी आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करावा, या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’ यंदा २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता सजाई गार्डन, फलटण येथे होणार आहे.
मॅरेथॉनचे यंदाचे ‘Run for Health & Happiness’ हे घोषवाक्य असून, ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण आणि बालकांपर्यंत सर्वांना या आरोग्य चळवळीत सहभागी होता येणार आहे. जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीसोबतच अवयवदानाचा संदेश देण्यात येणार आहे.
यंदाच्या मॅरेथॉनमध्ये २१ किमी, १० किमी आणि ५ किमी अशा विविध अंतरांच्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १२ वर्षांवरील सहभागींसाठी प्रथमच ३ किमी Fun Run, तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ किमी Walkathon आयोजित करण्यात आला आहे.
मॅरेथॉनमध्ये १८ ते ३०, ३१ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५६ ते ६४ वर्षे अशा चार वयोगटांमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार असून एकूण ६० बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
यंदाचे आणखी एक आकर्षण म्हणजे रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुडघा प्रत्यारोपण झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांची ३ किमी Walkathon होणार आहे. हा उपक्रम देशातील अशा प्रकारचा अनोखा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मॅरेथॉनचा मार्ग ऊस, फळबागा आणि द्राक्षमळ्यांमधून जाणारा नयनरम्य असणार आहे. सहभागींसाठी मार्गावर हायड्रेशन सुविधा, मॅरेथॉनपूर्वी झुंबा वॉर्मअप आणि मॅरेथॉननंतर मनोरंजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक रनरला आकर्षक टी-शर्ट, टाइम चिपसह बिब, कॅप, एनर्जी बार आणि उपयुक्त सरप्राईज गिफ्ट असलेले मॅरेथॉन किट देण्यात येणार आहे.
नोंदणी १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाइन करता येणार आहे. पुरुषांसाठी नोंदणी शुल्क ७५० रुपये + कर, महिलांसाठी ५०० रुपये + कर आणि ३ किमी Fun Run साठी ३०० रुपये शुल्क आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ किमी Walkathon मोफत आहे.
मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘आरोग्यासाठी धावूया, आनंदासाठी चालूया आणि निरोगी जीवनाकडे वाटचाल करूया’, असे आवाहन डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी, डॉ. प्राची प्रसाद जोशी आणि जोशी हॉस्पिटलच्या टीमने केले आहे.




