सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे तरूणाई बिघडत आहे-लेखक अभयकुमार देशमुख
कराड :- सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे तरूणाई बिघडत आहे. विद्यार्थी दशेत असताना आपल्या मुलाला मोबाईलचे वेड लागू नये, यासाठी पालकांनी काळजी घ्यावी. आज भारतात वृध्दाश्रमांची संख्या वाढत असून तेथील वृध्द आयुष्यात जीवन नको तर मरण मागतात, ही दुर्देवी शोकांतिका पहायला मिळते. आज केवळ विद्यालयीन शाळेतील शिक्षण हेच समाज घडवू शकते, असे प्रतिपादन पत्रकार, लेखक अभयकुमार देशमुख यांनी केले
गोटे (ता. कराड) येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या प्रितीसंगम विद्यामंदिरात संस्थेचे सचिव कै. ए. व्ही. पाटील यांच्या 13 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अभयकुमार देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डी. ए. पाटील होते. यावेळी पत्रकार विशाल पाटील, माजी मुख्याध्यापक जी. बी. देशमाने, मुख्याध्यापक के. आर. साठे, व्ही. एच. कदम, एम. बी. पानवळ, डी .पी. पवार, ए. आर. मोरे आदींची उपस्थिती होती.
अभयकुमार देशमुख म्हणाले, आण्णा शिक्षक, संस्थापक, कलाकार, साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू असे नाना प्रकारचे अंगी गुण असलेले व्यक्तिमत्व होते. आण्णांनी अनेक संस्था उभारून सर्वसामान्य कुटुंबातील मुले नोकरी लावली अन् हजारो विद्यार्थी घडवून समाज घडविला. ए. व्ही. पाटील आण्णा यांचे कार्य यशवंत शिक्षण संस्थेच्या रोपट्यातून वटवृक्ष झाले असून पिढ्यानपिढ्याना दिशादर्शनक राहील.
डी. ए. पाटील म्हणाले, आण्णांनी कासेगाव येथून येवून कराड तालुक्यात संस्था उभारली. आज सदाशिवगड, सुर्ली, गोटे- मुंढे, वडगाव हवेली येथे हजारो विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत. यापुढील काळात या संस्थेचा वटवृक्ष अजून वाढविण्याची जबाबदारी आमची आहे.
विशाल पाटील म्हणाले, शिक्षणामुळे समाज घडत गेला. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर आण्णांचा जो विचार होता. तोच विचार कमवा आणि शिका योजनेतून गरिबीतून पुढे आलेल्या ए. व्ही. पाटील सरांनी घेतला. त्यामुळे यशवंत शिक्षण संस्थेसाठी आण्णा कर्मवीरच आहेत. बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, त्यांचा उध्दार झाला पाहिजे हे व्रत आण्णांनी जपले. यावेळी वडगाव हवेली येथील आसावरी तुळसणकर या विद्यार्थींनीने दहावी परिक्षेत संस्थेत मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. वेदिका पवार या विद्यार्थींने ए. व्ही. पाटील सर यांच्याविषयी भाषण केले. पुण्यतिथी निमित्ताने व्ही. एच. कदम, एस. डी. वेताळ यांनी मनोगत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आण्णासो मोरे यांनी केले. सुत्रसंचलन संभाजी चव्हाण यांनी केले. आभार समर्थ बनसोडे यांनी मानले.