यशोदा इन्स्टिट्यूट चे तंत्रशिक्षणातील कार्य कौतुकास्पद: ना.आशिष शेलार
नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर यशोदा इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद
यशोदा इन्स्टिट्यूट चे व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणातील कार्य हे कौतुकास्पद आहे. सातारा सारख्या परिसरामध्ये शैक्षणिक क्रांती घडविण्याच्या दृष्टीने यशोदा इन्स्टिट्यूटने केलेले कार्य बदल घडवणारे आहे असे प्रतिपादन माहिती व तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार यांनी यावेळी केले. ते यशोदा टेक्निकल कॅम्पस मधील विद्यार्थ्यांशी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर संवाद साधत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे प्रमुख उपस्थित होते.
दरम्यान यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ना. आशिष शेलार आणि छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाअध्यक्ष धैर्यशीलदादा कदम हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. आशिष शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे यशस्वीरित्या कार्यरत झाले असल्याचे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यावर आधारित शिक्षण घेता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करता येणार असून त्यामुळे त्यांच्या यशस्वी जीवनाचा पाया अधिक भक्कम करता येईल असेही ते म्हणाले.
यशोदा इन्स्टिट्यूट च्या वतीने प्रा. दशरथ सगरे यांच्या हस्ते ना. आशिष शेलार, ना.छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी उभय मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांशी समरस होऊन त्यांच्याशी संवाद साधला. यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी आपल्या मनोगतांमध्ये यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक संसाधनाविषयी आणि भविष्यातील योजनांविषयी आपले मत प्रकट केले. सातारा शहरांमध्ये जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यशोदा इन्स्टिट्यूटच्या रूपाने तंत्रशिक्षणातील नावारूपाला आलेले विद्यापीठ म्हणून आगामी काळामध्ये आपण समोर येणार असल्याचे देखील ते म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, यशोदा टेकनिकल कॅम्पसचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन्ही मंत्र्यांकडून प्रा. दशरथ सगरे यांचे विशेष कौतुक
इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांना नुकताच राज्यस्तरीय कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. यशोदा इन्स्टिट्यूटच्या आणि प्रा. दशरथ सगरे सरांच्या कार्याला ना.आशिष शेलार, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.