यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, सातारा येथे ‘एचआर कॉन्क्लेव्ह २०२६’चे आयोजन
सातारा : यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, सातारा यांच्या वतीने १३ मार्च २०२६ रोजी “एचआर कॉन्क्लेव्ह २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कॉन्क्लेव्हचा मुख्य विषय “Intelligent Workforce 4.0: Integrating AI, IT, FinTech and Strategic Human Capital – Redefining Talent, Leadership and Digital Transformation” असा असून उद्योगजगत, मानव संसाधन व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानातील नव्या घडामोडींवर सखोल चर्चा या माध्यमातून होणार आहे.
या कॉन्क्लेव्हमध्ये देशातील नामांकित कंपन्यांचे मानव संसाधन तज्ञ सहभागी होणार असून KPIT, EPAM Systems, BDO International, BankBazaar, Renault Nissan Technology & Business Centre India यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्योग क्षेत्रातील अनुभव, आधुनिक कार्यपद्धती आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी याबाबत ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमामध्ये विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये की-नोट अॅड्रेस, पॅनेल डिस्कशन आणि तज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र यांचा समावेश आहे. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सिक्युरिटी, फिनटेक आणि मानव संसाधन व्यवस्थापनातील बदलत्या संकल्पना या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कॉन्क्लेव्हमध्ये मानव संसाधन क्षेत्रातील अनुभवी तज्ञ जोएल सेबॅस्टियन, श्रीकांत जाधव तसेच विविध कंपन्यांतील वरिष्ठ एचआर अधिकारी हे संसाधन व्यक्ती म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना उद्योगजगताचा प्रत्यक्ष अनुभव आणि मार्गदर्शन देणार आहेत.
यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे आणि उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कॉन्क्लेव्हमध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी तसेच इतर विभागातील १००० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असून भविष्यातील करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. उद्योग-अकॅडेमिया सहकार्य मजबूत करण्यासाठी हा कॉन्क्लेव्ह महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.




