एनपीए शून्य टक्के करण्याचा वाई अर्बन बँकेचा निर्धार
वाई, दि. 23 –आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रिझर्व्ह बँकेने दिलेल्या उद्दिष्टानुसार दि वाई अर्बन बँकेने 95 कोटी रूपयांची थकीत कर्ज वसुली केली आहे. चालू आर्थिक वर्षात आगामी काळात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली हे उद्दिष्ठ ठेवले असून बँकेचा एनपीए शून्य टक्के करणार असल्याचा निर्धार बँकेचे अध्यक्ष श्री. अनिल मोरेश्वर देव यांनी व्यक्त केला.
बँकेची 103 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी वाईतील साठे मंगल कार्यालयात पार पडली. याप्रसंगी अध्यक्ष देव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे, संचालक अँड. बाळकृष्ण पंडीत, माधव कान्हेरे, मकरंद मुळ्ये, काशीनाथ शेलार, चंद्रकांत गुजर, प्रितम भुतकर, स्वप्नील जाधव, बोर्ड आँफ मॅनेजमेंटचे सदस्य अविनाश जोशी, संचालिका अँड. सौ. सुनिती गोवीत्रिकर, सौ. ज्योती गांधी उपस्थित होते. श्री. अनिल देव म्हणाले, मागील आर्थिक वर्षात शासनाच्या सहकार विभागाचे अधिकारी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, पालक अधिकारी सहाय्यक निबंधक जगन्नाथ शिंदे, सहकार, महसूल व शासनाच्या सर्व विभागाचे अधिकारी, बँकेचे संचालक मंडळ सदस्य, कर्मचारी वर्ग व बँकेचे हितचिंतक सभासद यांच्या संयुक्त प्रयत्नांतून मोठ्या प्रमाणात बँकेच्या थकीत कर्जांची वसुली झाली. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने एप्रिल 2024 पासून बँकेस रू. 25 लाखांपर्यंतची तारण कर्जे देण्यास मंजुरी दिली आहे. बँकेतील नियमित खर्च कमी करणेसाठी आगामी काळात वाशी, जयसिंगपूर व महाड या तीन शाखा अन्यत्र हलविणे किंवा बंद करणेचा संचालक मंडळाचा विचार आहे. याबाबत आगामी काळात योग्य निर्णय घेण्यात येईल. गेल्या तीन-चार महिन्यांत बँकेने दिलेली सर्व कर्जे नियमित परतफेडीने सुरू आहेत. आगामी काळात बँकेचा नावलौकीक वाढत राहील, असेच काम संचालक मंडळ करेल.
संचालक विवेक पटवर्धन म्हणाले, जुनी कर्जे वसूल करीत असताना काही खात्यांबाबत कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक कर्जदार, जामीनदार दुखावले गेले आहेत. परंतु रिझर्व्ह बँकेच्या नियमांत राहून बँक थकीत कर्ज वसुली करणे गरजेचे आहे. आगामी काळात नवीन ग्राहकांचा कल लक्षात घेऊन इंटरनेट- मोबाईल बँकींग, वाँचमन लेस एटीएम सेंटर्स, बँकेच्या सेवा सुविधांच्या माहितीसाठी मार्केटिंग विभाग आदी बदल करण्याचे उद्दिष्ट आहे. 2012 नंतर काही थकीत कर्जे वाढली आहेत. त्यातील सर्व कर्जे बंद करून बँकेला गतवैभव मिळवून देणे, हे आमचे ध्येय आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत आम्ही पूर्ण करणार आहोत. मागील काळामध्ये बँकेचे जे नियमित कर्जदार होते. त्यांनी बँकेशी संपर्क साधून नव्याने कर्जे घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय वाढवावा व बँकेचाही फायदा करून द्यावा. बँकेच्या सहकार्याने अनेक लोकांनी आपले संसार उभे केले आहेत. सभासदांनी भागभांडवलात जास्तीत जास्त रक्कम गुंतवावी व बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बँकेचे माजी अध्यक्ष सतीश शेंडे, माजी संचालक अँड. सीए श्री. राजगोपाल द्रवीड, प्रा. विष्णू खरे, डाँ. प्रकाश पोरे, विनय पोरे, मिलिंद पाटणकर, डी. के. जायकर, डाँ. मकरंद पोरे, दत्तात्रय रासकर आदींनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला व काही सूचना केल्या. संचालक श्री. महेश राजेमहाडीक यांनी सुरूवातीस दुखवटा ठराव मांडला. सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सहा. सरव्यवस्थापक आनंद पटवर्धन यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. सहा. सरव्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. संचालक श्री. अशोक लोखंडे यांनी आभार मानले. सौ. मनीषा घैसास यांनी वंदे मातरम गायले-. सभेस माजी अध्यक्ष अरूण देव, डाँ. मधुसूदन मुजुमदार, माजी उपाध्यक्ष अँड. प्र. ल. सोनपाटकी, श्री. सुनील शिंदे, माजी संचालक मिलिंद भंडारे, श्री. मदनलाल ओसवाल, श्री. मनोज खटावकर, श्री. स्वरूप मुळे, डाँ. सुधीर बोधे, नरहरी महाबळेश्वरकर, श्री. किशोर अभ्यंकर, माजी संचालिका सौ. अंजली शिवदे, सौ. अनुराधा जोशी, सौ. योगिनी गोखले, सीए. डी. बी. खरात, सीए. स्वप्नील बचुटे, पत्रकार दत्तात्रय मर्ढेकर, मधु नेने, भद्रेश भाटे, व्यापारी संघटनेेचे अध्यक्ष सचिन फरांदे आदी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
