वाई नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी : राजकीय हालचालींना वेग, इच्छुकांच्या रांगा वाढल्या
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)दि. ६ ऑक्टोबर २०२५ वाई नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यंदा नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे वाईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध पक्षांतील इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.
गेल्या निवडणुकीत हे पद महिलांसाठी आरक्षित होते, त्यामुळे अनेक अनुभवी उमेदवारांना संधी मिळाली नव्हती. मात्र यंदा खुला प्रवर्ग जाहीर झाल्यामुळे पुरुष व महिला दोघांनाही समान संधी उपलब्ध झाली आहे.
राज्य शासनाच्या नगरपरिषद महासंचालनालयाच्या निर्णयानंतर प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या रणनितीवर मंथन सुरू केले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा या सत्ताधारी पक्षांमध्ये युती कायम राहणार का, की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष दीपक ननावरे म्हणाले की, “गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमचा उमेदवार एकमताने निवडून आला होता. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसारच काम केले जाईल.”
शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे यांनी सांगितले, “वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. स्वबळाचा नारा दिला तरी शिवसेना ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे.”
आरपीआयचे स्वप्नील गायकवाड म्हणाले, “आमच्या आरक्षित जागेवरील नगरसेवक उमेदवाराला नगराध्यक्षपदाचे इच्छुक जर सहकार्य व सन्मान देतील, तर आम्हीही त्यांच्या पाठिशी उभे राहू.”
तसेच ‘उबाठा ‘ गटाचे अनिल शेंडे आणि स्वप्नील भिलारे यांनी देखील स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे एकत्र लढणारे हे पक्ष यंदा वेगळ्या वाटेवर जातील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या साऱ्या घडामोडींमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. युती टिकून राहिली नाही, तर मकरंद आबा कोणती भूमिका घेतील, याकडे संपूर्ण वाईकरांचे लक्ष लागून राहिले आहे. आत्ताच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मकरंद पाटील यांना दिलेला वाईकरांनी प्रचंड मताच्या आरोपी आशीर्वाद भविष्यात नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आबा बाजी मारतील का हाही प्रश्न उपस्थित होत आहे आबांनी केलेले कामाची पोचपावती आबांना मिळणार का शिवसेना भाजपा आरपीआय शिवसेना उबाठा या पक्षाची निर्णायक भूमिका वाईकरांचा नगराध्यक्ष ठरवणार असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे.
