वाई विधानसभा नुरा कुस्ती होणार नाही
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय.राजकीय पक्षांमध्ये चर्चा, बैठकांना जोर असला तरी जागावाटप झाले नाहीं आहे. निवडणुकीच्या तोंडावर बऱ्याचजणांनी पवित्र गंगास्नानाची तयारी केलेली दिसते. राजकारण्यांपेक्षा सामान्य जनतेत प्रचंड उत्साह, कमालीची सजगता जाणवते. वाई विधानसभाही ह्या परिस्थितीला अपवाद कशी असेल. सामान्य माणसाच्या ठायी असामान्य ताकद असते याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आली, यंदाच्या निवडणुकीत वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाने वेगळाच नूर धरल्याचे जाणवते, प्रस्थापितांच्या विरोधातील वादळ कुणाकुणाला भुईसपाट करेल हे नजीकच्या काळात पाहायला मिळेल.
वाई विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदारांची उमेदवारवर्णी निश्चित आहे, प्रथमदर्शनी तगडी दावेदारी आहे कारण तिन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांची रवंथ करणारी भलीमोठी फौज विद्यमान लोकप्रतिनिधींच्या दावणीला आहे, सुसज्ज यंत्रणा आहे, तालुक्यातील बहुतेक संस्थांवर त्यांचाच वरचष्मा आहे, जास्तीत जास्त महत्त्वाची पदं स्वतःच्या घरात आहेत, पारंपारिक विरोधकांमध्ये पुरता सन्नाटा पसरला आहे, सोबतीला राज्यसभा खासदारकीचा तडका आहेच. नवकोट नारायणालाही लाजवेल असे साम्राज्य आहे. मध्यंतरी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला मुक्तहस्ताने केलेला खर्च तसेच वाईतील धाकल्या पवारांच्या सभेसाठी केलेली दौलतीची उधळण डोळे दिपवणारी होती, हे सगळं कुठल्या पुरोगामी तत्त्वात बसतं हे सामान्य माणसाला कळायला मार्ग नाही. स्वर्गलोकी विसावलेल्या लोकनेते स्व. चव्हाण साहेब व स्व. आबासाहेब वीरांना देखील चिंता करावी लागत असेल अशीच सध्याची मतदारसंघातील परिस्थिती आहे. विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीत विस्कळीतपणा दिसत असला तरी होवून गेलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्रितपणाने जोर लावल्यामुळे जिल्ह्यात सर्वात जास्त मताधिक्य देणारा वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ ठरला. महाविकास आघाडीकडे श्री शरद पवारांसारखं चालणार नाणं आहे, मतदारसंघ कुठल्याही पक्षाकडे गेला तरी विद्यमान लोकप्रतिनिधींचे जिल्ह्यातील नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चांगलाच सलोखा आहे, उमेदवार निश्चिती नसल्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे त्यांच्यामध्ये अनेकजण उमेदवारी करण्यास सक्षम आहेत परंतु अनेक वर्षे दुसऱ्या फळीत राबलेल्या कार्यकर्त्यांची सामाजिक प्रतिष्ठा याच नेते मंडळींनी जाणीवपूर्वक संपवली त्यामुळेच पक्षश्रेष्ठींकडून सक्षम पर्यायी उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत असावा त्यातच निवडणुका लांबल्यामुळे इच्छुक उमेदवारांची जोर बैठका काढून पूर्ती दमछाक झालेली दिसते. मतदारसंघाबाहेरील इतर तालुक्यातील काही नेत्यांना वाईमध्ये उमेदवारीची आस लागल्याचे चित्र आहे. महायुती विरोधातील वातावरणच सर्व घटकांना एकत्रित करून सर्व ताकतीनिशी पर्याय उपलब्ध व्हावा अशीच मतदार संघातील जनमाणसाची भावना आहे परंतु राजकारण नेहमी सोयीचं घडवून आणलं जातं असा प्रघात आहे त्यामुळे वाई विधानसभा मतदारसंघातील लढत ही नुरा कुस्ती प्रकारात मोडणारी असेल असं जाणकारांकडून बोललं जातं असलं तरी सामान्य मतदाराला हे मान्य नाही ही गोष्ट खरी आहे.
वाई विधानसभा मतदारसंघात तरुण मतदारांचा भरणा अधिक आहे, नेते-कार्यकर्ते एकीकडे तर सामान्य मतदार तिसरीकडे असे एकूण चित्र आहे, विधानसभा निवडणुका ह्या स्थानिक मुद्द्याना घेऊन लढल्या जाणार, सलग १५ वर्षे विधानसभेचे प्रतिनिधीत्व करायला मिळालेल्या लोकप्रतिनिधींकडून आजपर्यंत तिन्ही तालुक्यात कसलंही भरीव काम झालं नसल्याची लोकभावना आहे, सत्ता व दामूअण्णांच्या जोरावर या मंडळींनी संपूर्ण मतदारसंघ वेठीला धरला, माणूस माणसात राहणार नाही याची पुरेपूर तजवीज केली, जाणीवपूर्वक घरोघरी पुढारी तयार केले जेणेकरून कोणी कोणाच्या समर्थनात उभे राहू नये याची पुरती काळजी घेतली, प्रस्थापितांच्या या कुरापती सामान्यांना उमगू लागल्या तसा सामान्य नागरिक जागरूक झाला, विरोधाची, संघर्षाची भाषा करू लागला. येत्या विधानसभा निवडणुकीत वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील सामान्यांच्या भावनांना वाट करून देण्याचं काम निश्चित होणार, सक्षमपणाने त्यांना अभिप्रेत असणारा कॉमनमॅनचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार.
श्री कल्याण पिसाळ देशमुख,
सरचिटणीस-सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी,
