वर्षभरात पूर्ण होणार पुणे–कोल्हापूर मार्गाचे काम — मंत्री नितीन गडकरी
सातारा -राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे–कोल्हापूर या महत्त्वाच्या मार्गाच्या कामाच्या विलंबाबाबत संसदेत विचारणा केली असता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सविस्तर उत्तर दिले. पुणे–सातारा रस्त्याचे काम पूर्वी रिलायन्सकडे होते, मात्र ते रद्द करून या कामाचा पुन्हा आढावा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली. पुणे बायपासवरील सर्व्हिस लेनचे काम विभागामार्फत सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
खंबाटकी घाटातील दोन नव्या बोगद्यांपैकी एक बोगदा लवकरच सुरू करण्यात येणार असून साताऱ्यापासून कोल्हापूरपर्यंतच्या कामात काही तांत्रिक अडचणी असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार असून संपूर्ण पुणे–कोल्हापूर मार्गाचे काम वर्षभराच्या आत पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.




