मी उमेदवार असताना घार्गेंची अस्मिता कुठे होती ? –डॉ.येळगावकर
पाणी चळवळीशी विरोधकांचा सुतराम संबंध नाही
सातारा : प्रतिनिधी प्रभाकर घार्गे खटाव तालुक्याच्या अस्मितेच्या आणि सन्मानाच्या नुसत्या बाता मारत आहेत. २००९ साली मी विधानसभा निवडणूकीला उभा होतो तेव्हा त्यांनी माणच्या पोळ तात्यांचे काम केले होते. तेव्हा त्यांची खटाव तालुक्याबद्दलची अस्मिता कुठे गेली होती असा सवाल डॉ. दिलीप येळगावकरांनी उपस्थित केला. आ.जयकुमार गोरेंच्या विरोधात एकत्र आलेल्यांचा पाणी चळवळीशी सुतराम संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सिध्देश्वर कुरोली येथे महायुतीचे उमेदवार आ. जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. येळगावकर पुढे म्हणाले,मी १९८९ पासून माण – खटावच्या पाण्यासाठी संघर्ष केला आहे. आत्ता जे विरोधात आहेत त्यातील कुणीच माझ्याबरोबर पाणी चळवळीत नव्हता. त्यांनी कधी पाण्यासाठी संघर्ष आणि आंदोलने केली नाहीत. आ. जयकुमार गोरेंनी विधानसभेत, मंत्रालयात खूप मोठा संघर्ष करुन जिहेकठापूर, उरमोडी, तारळीचे पाणी आणले आहे. या योजनांसाठी त्यांनी हजारो कोटींचा निधी खेचून आणला आहे. आता पाणी यायला लागल्यावर विरोधक श्रेय घेण्यासाठी पाणी चळवळींचा दिखाऊपणा करत आहेत. शरद पवारांनी मला पाण्याचे अश्वासन दिले होते पण त्यांनी ते कधीच पूर्ण केले नाही. जयंत पाटलांनी तर टेंभूचे पाणी माण आणि खटावला देताच येत नाही असे सांगितले होते. जयकुमार गोरेंनी मात्र फेरजलनियोजनातून अडिच टीएमसी पाणी आणले आहे.
डॉ. येळगावकर पुढे म्हणाले, ज्या राष्ट्रवादीने त्रास दिला त्या राष्ट्रवादीसमोर प्रभाकर घार्गे नाक घासत आहेत. त्यांना आत्ता खटाव तालुक्याचा सन्मान आठवला आहे. २००९ साली मी विधानसभेला उभा होतो तेव्हा त्यांना मदत करण्याची विनंती केली होती. मी खटाव तालुक्यातील असूनही घार्गेंनी तेव्हा मला मदत केली नव्हती. तेव्हा त्यांची खटाव तालुक्याबद्दलची अस्मिता कुठे गेली होती. घार्गेंसाठी आम्ही बरेच काही केले आहे, मात्र त्यांनी आमचा विश्वासघात केल्याचेही येळगावकरांनी सांगितले.