किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी
खासदार उदयनराजे भोसले यांचा विश्वास; शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी लागेल ती मदत करणार
वाई : वाई तालुक्यातील खंडाळा आणि भुईंज या दोन्ही किसन वीर सहकारी साखर कारखान्यांच्या भवितव्यासाठी मी आमदार मकरंद पाटलांना लागेल ती मदत करायला तयार असून त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहीन, असा विश्वास सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस प्रतापराव पवार जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे जिल्हा बँकेत संचालक राजेंद्र राजपुरे सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र लवंगारे संजय गायकवाड शामराव गाढवे मदन आप्पा भोसले माजी कृषी सभापती मनोज पवार नितीन भिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे भोसले म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांना काँग्रेसच्या सरकारच्या काळात आयकर भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. हा आयकर माफ करण्याचा निर्णय भाजप सरकारच्या काळात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतला. याचा शेतकऱ्यांना फार मोठा फायदा झाला आहे. साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन वाढी साठी भाजप सरकारने अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. कृषी शास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी शेतकऱ्यांसाठी इर्मा योजना लागू करण्याची संकल्पना मांडली. त्याबाबतची सरकारच्या माध्यमातून निर्णय होईल.
मकरंद पाटील म्हणाले, खंडाळा आणि वाई तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार करून आपण महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. खंडाळा कारखाना आणि भुईंज येथील किसन वीर दोन्ही कारखाने अडचणीत आहेत. दोन्ही तालुक्यातील 85000 कुटुंबे या कारखान्यावर अवलंबून आहेत. दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे या दोन्ही कारखान्यांची जबाबदारी आमदार म्हणून मी घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून कर्जात असलेल्या या कारखान्याची जोकीम सरकारने घेतलेली आहे. कारखान्यांना घातलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांना देण्यासाठी हे गरजेचं होतं. भविष्यात चांगले चालून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह सुरू ठेवण्यासाठी आपण महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान मेळाव्यासाठी वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी ऊस लावून अजिंक्यतारा, किसनवीरला घालणार मी ऊस लावणार आहे. त्यापैकी एका शेतातील ऊस किसन वीरला तर दुसऱ्या शेतातील अजिंक्यतारा कारखान्याला पाठवणार आहे, अशी उदयनराजेंनी घोषणा केली.
आता कोणतीच संभ्रमावस्था नको : मकरंद पाटील
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना आपण पूर्णपणे सहकार्य करणार आहोत याबाबत मनामध्ये कोणतीच शंका ठेवू नका सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावात जाऊन उदयनराजेच्या प्रचाराला सुरुवात करा असा आदेश आमदार मकरंद पाटील यांनी या मेळाव्यात केला.