मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट. कोकाटे मुंबईतील रुग्णालयात
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झालेले राज्याचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट जाहीर केले आहे. संपर्कहिन असणारे मंत्री कोकाटे मुंबईतील रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले जाते. वैद्यकीय कारणास्तव शरण येण्यासाठी त्यांनी चार दिवसांची मुदत मागितली होती. परंतु, न्यायालयाने ती फेटाळल्याने मंत्री कोकाटे यांची अटक आता अटळ मानली जाते.
मंगळवारी या प्रकरणाचा निकाल लागला होता. त्या दिवशी मंत्री कोकाटे व त्यांचे बंधू न्यायालयात उपस्थित नव्हते. निकाल जाहीर झाल्यापासून मंत्री कोकाटे यांचा भ्रमणध्वनी बंद होता. ते संपर्कहिन झाल्याचे दिसत होते. बनावट दस्तावेजाच्या आधारे अल्प उत्पन्न गटातून शासकीय कोट्यातील सदनिकेचा लाभ घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने गेल्या फेब्रुवारीमध्ये मंत्री कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली होती. अपिलात सत्र न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्याने त्यांची आमदारकी व मंत्रिपद धोक्यात आले आहे.
बुधवारी कोकाटे यांच्यावतीेने ॲड. मनोज पिंगळे यांनी मंत्री कोकाटे यांना वैद्यकीय कारणास्तव शरण येण्यास चार दिवसांचा अवधी देण्याची विनंती अर्जाद्वारे करण्यात आली होती. उच्च न्यायालयात आम्ही अपील दाखल करीत असल्याचे ॲड. पिंगळे यांनी म्हटले आहे. परंतु, कोकाटे यांचा हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आणि अटक वॉरंट जारी केल्याचे सरकारी वकील ॲड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी लोकसत्ताला सांगितले.
मंत्री कोकाटे हे मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात मूळ तक्रार दिवंगत माजीमंत्री तुकाराम दिघोळे यांनी केली होती. न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर यावर माजीमंत्री दिघोळे यांची कन्या ॲड. अंजली दिघोळे-राठोड आणि ॲड. आशुतोष राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोकाटे हे कॅबिनेट मंत्री असून न्यायालयाने काही अवधी द्यावा, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती. परंतु, तेव्हा न्यायालयाने कायद्यापुढे सर्व लोक समान असल्याचे नमूद केल्याचे ॲड. राठोड यांनी सांगितले. वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल झाल्याचा कुठलाही पुरावा देण्यात आला नाही.
आता नाशिक पोलिसांनी मंत्री कोकाटे यांना अटक करून कारागृहात रवानगी करणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधी लगेच अपात्र ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यायप्रिय आहेत, आता तरी त्यांनी मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेऊन महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती द्यावी, अशी मागणी ॲड. आशुतोष राठोड यांनी केली.




