Home » राजकारण » वाई मतदारसंघातून विराज शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष

वाई मतदारसंघातून विराज शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष

वाई मतदारसंघातून विराज शिंदे यांच्या भूमिकेकडे लक्ष

वाई – विधानसभा निवडणूकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेल्या अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचाराची दिशा अद्यापही निश्चित नसल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे विराज शिंदे यांना उमेदवारी द्यावी यासाठी सर्वोच्च पातळीवरुन प्रयत्न करण्यात येत होते. परंतु तरीही हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाने सोडला नाही. त्यामुळे विराज शिंदे यांना निवडणूक लढता आली नाही पर्यायाने उमेदवारीची माळ  अरुणादेवी पिसाळ यांच्या गळ्यात टाकण्यात आली आहे. 

स्वतः विराज शिंदे या मतदारसंघातून गेली सात वर्षांपासून प्रयत्न करीत होते. त्यांनी या मतदारसंघात आपला उत्तम जनसंपर्क निर्माण केला आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला डावलण्यात आले. त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. परंतु वरीष्ठांच्या सांगण्यावरुन त्यांनी हत्यारे म्यान करीत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. पण स्वतः शिंदे यांचे या मतदारसंघात अतिशय उत्तम नेटवर्क असून त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली आहे. याखेरीज त्यांनी निवडणूकीपुर्वी काढलेल्या परिवर्तन निर्धार यात्रेला देखील अतिशय तगडा प्रतिसाद मिळाल होता. हे लक्षात घेता विराज शिंदे यांची नेमकी काय भूमिका आहे याबाबत निश्चित अशी कोणतीच स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही. तसेच पक्षश्रेष्ठींनी देखील त्यासंदर्भात त्यांच्याशी कसलाही संपर्क साधला नाही. त्यामुळे विराज शिंदे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे. 

शिंदे यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अरुणादेवी पिसाळ यांचा प्रचार अद्याप थंडाच असून त्या तुलनेत मकरंद पाटील यांनी प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात आघाडी घेतल्याचे दिसून येते.

नात्यांच्या राजकारणात चांगल्या उमेदवाराचा बळी दिल्याची चर्चा

अरुणादेवी पिसाळ या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या नातेवाईक आहेत. त्यांना वाई विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. यातून विराज शिंदे यांची उमेदवारी कापण्यात आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. दरम्यान, स्थानिक कार्यकर्ते विराज शिंदे यांच्या इशाऱ्याची वाट पाहत असून त्यांचा आदेश आल्याशिवाय प्रचारात सक्रीय होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket