उत्कर्ष पतसंस्थेची आर्थिक प्रगती उल्लेखनीय – मार्च २०२५ अखेरील माहिती जाहीर
वाई, ता. ५ एप्रिल – उत्कर्ष पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय आर्थिक प्रगती साधली असून मार्च २०२५ अखेरील आर्थिक स्थिती नुकतीच पत्रकार परिषदेमध्ये संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी मुख्य शाखेच्या २६ व्या वर्धापन दिना निमित्त जाहीर केली.
श्रीमती कोल्हापुरे म्हणाल्या की, चालू आर्थिक वर्षात संस्थेने ₹१.७० कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. संस्थेच्या ठेवांमध्ये एकूण ₹१७ कोटींची वाढ झाली असून सध्या एकूण ठेवांची रक्कम ₹१२२ कोटींवर पोहोचली आहे. तसेच कर्जवाटप ₹९५ कोटींवर पोहोचले असून, संस्थेच्या सर्वच योजनांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
यंदाच्या वर्षात संस्थेच्या एकत्रित व्यवसायात भरीव वाढ झाली असून एकूण व्यवसाय ₹२१७ कोटींपेक्षा अधिक झाला आहे. संस्थेचे भागभांडवल सध्या ₹७.९० कोटी, सभासद संख्या २४४१६ असून दिवसेंदिवस ग्राहकांचा संस्थेप्रती विश्वास दृढ होत असल्याचे दिसून येत आहे. संस्थेच्या ५५ कोटी गुंतवणूक, ४१ कोटींचे सोनेतारण कर्ज या सर्व आर्थिक बाबींचा विचार करता उत्कर्ष पतसंस्थेच्या लिक्विडिटी बेस् प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत 99.60%ठेवी सुरक्षित आहेत आणि संस्थेची हि अत्यंत जमेची बाजू असल्याचे देखील त्यांनी सांगितलं.
संस्थेच्या या यशस्वी वाटचालीचे श्रेय सर्व सभासद, ठेवीदार, कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या सहकार्याला देत, अध्यक्षा श्रीमती कोल्हापुरे म्हणाल्या की, उत्कर्ष पतसंस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. वृद्ध नागरिकांसाठी घरपोच सेवा, महिला बचत योजना, लहान बचतीला प्रोत्साहन देणाऱ्या योजना यामुळे संस्थेचा सामाजिक विश्वास अधिक बळकट झाला आहे.या पत्रकार परिषदेस संस्थेचे उपाध्यक्ष, सर्व संचालक, मुख्य व्यवस्थापक, शाखा प्रमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
