महाराष्ट्रातील सर्वात आधुनिक सातारा कृषि उत्पन्न बाजार समिती असेल : उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
सातारा -(अली मुजावर )कृषि उत्पन्न बाजार समिती सातारा कार्यालयाचे आज खिंडवाडी, सातारा येथे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित शेतकरी आणि व्यापारी बंधू-भगिनींना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले शेतमालाच्या बाजाराची उत्तम व्यवस्था असल्यास शेतमालाला योग्य भाव मिळतो. त्यादृष्टीने सातार्यामध्ये कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अतिशय भव्य उपबाजाराच्या निर्मितीचे भूमिपूजन होणे ही आनंदाची बाब आहे.
ज्यांनी सातार्याला विकासाचा वारसा दिला त्या स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंह भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती उभी राहत आहे.130 कोटींच्या गुंतवणुकीतून सुमारे 15 एकरमध्ये ही अतिशय प्रशस्त अशी इमारत उभी होते आहे. यामार्फत शेतकर्यांसाठी फळे आणि भाजीपाल्याचा बाजार, व्यापारी गाळे, कांदा-बटाटा मार्केट, कोल्ड स्टोरेज, सेल हॉल आणि गोदाम अशा सर्व प्रकारच्या सोई उपलब्ध होणार आहेत. यासोबतच येथे शेतकरी, व्यापारी आणि हमाल भवनाची इमारत देखील उभी राहत आहे. यामार्फत शेतकर्यांसाठी हक्काची चांगली सोय होणार आहे. महाराष्ट्रातील एक अत्याधुनिक बाजार समिती म्हणून उदयास येणार्या सातार्याच्या या बाजार समितीच्या निर्मितसाठी शासनाची लागेल ती मदत देण्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले
यावेळी श्रीमंत छत्रपती आ.शिवेंद्रराजे भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मान्यवर उपस्थित होते.