कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे खुनाच्या गुन्हयामध्ये शिक्षा भोगत असलेल्या पॅरोल रजेवरील फरार आरोपी जेरबंद

श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी कारागृहातून संचित/अभिवचन रजेवर गेलेले बंदी नियत दिनांकास हजर न होता अनाधिकृतरित्या कारागृहाबाहेर राहून लपून बसलेले असून त्यांचा शोध घेवून त्यांना मध्यवर्ती कारागृहात जमा करण्याबाबतचे आदेश पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिले होते.
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील संचित/अभिवचन रजेवरुन अनाधिकृतरित्या कारागृहाबाहेर असणारा शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं.21/2024 IPC 302, 498(अ) या खुनाच्या गुन्हयातील आरोपी (बंदी) भरत कांतीलाल ओसवाल, रा.गुलमोहोर कॉलनी, शाहुपूरी सातारा हा शाहुपूरी हा दिनांक 14/05/2020 रोजी 45 दिवस पॅरोल रजेवर गेला होता. तद्नंतर त्याने कोविडचा फायदा घेवून टप्प्या टप्प्याने रजा वाढविली होती. रजेचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर दिनांक 19/05/2022 रोजी तो नियोजित मुदतीत परत कारागृहात हजर होणे अपेक्षित होते. मात्र, पॅरोलची मुदत संपली… दिवस गेले… आणि भरत ओसवाल कारागृहात परतलाच नाही. यास्त्व कारागृह शिपाई मुकूंद अशोक कापरे, कोल्हापूर कळंबा कारागृह यांनी दिले फिर्यादीवरुन तो फरार असल्याबाबत त्याचे विरुध्द शाहूपूरी पोलीस ठाणे गु.र.नं.236/2022 भादविक 172, 224 अन्वये दाखल करण्यात आला होता.
कारागृह प्रशासनाने भरत ओसवाल यास फरारी घोषित केले होते. त्याबाबतची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथे विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. फरारी आरोपीस पकडण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते कारण आरोपीकडे घरच्यांची, मित्रांची आणि जुन्या संपर्कांची माहिती होती. त्यामुळे तो त्याची ओळख लपवून, वेशांतर करुन वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याचा ठावठिकाणा मिळवणे कठीण होत-होते. तपास पथकाने सर्वप्रथम आरोपीच्या जुन्या संपर्कांचे विश्लेषण सुरू केले. नातेवाईक व मित्रांकडून मिळणाऱ्या गुप्त माहितीकडे बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. दरम्यान तो अधूनमधून वेगवेगळ्या ठिकाणांहून आपल्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधत असल्याचे तपास पथकाचे लक्षात आल्याने पोलीस त्याच्या मागावर होते.
दिनांक 01/7/2026 रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील संचित/अभिवचन रजेवरुन अनाधिकृतरित्या कारागृहाबाहेर असणारा बंदी भरत कांतीलाल ओसवाल, रा.गुलमोहोर कॉलनी, शाहुपूरी सातारा हा शाहुपूरी चौक सातारा येथे उभा आहे. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक तात्काळ शाहुपूरी चौक येथे पाठविले. नमुद पथकाने फरार बंदी भरत कांतीलाल ओसवाल यास ताब्यात घेवून त्यास शाहूपूरी पोलीस ठाणे गु.र.नं.236/2022 भादविक 172, 224 या गुन्हयाचेकामी शाहुपूरी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, पृथ्वी जाधव, रोहित निकम, महेश निर्मळ यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे श्री.निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.




