ठाकरेंच्या ६ बंडखोर खासदारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न
मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील या खासदारांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘शिवसेना हे कुटुंब आहे. परिवार आहे. खऱ्या शिवसेना परिवारात, बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेना परिवारात कट्टर शिवसैनिक खासदार सामील झाले आहेत. त्यांचं मी पक्षात स्वागत करतो. चार वर्षापूर्वी 22 जून 2022 रोजी शिवसेनेने आम्ही उठाव केला होता.
तेव्हा 40 आमदार सुरुवातीला आले. त्यानंतर पुन्हा चौकार नाही, षटकार मारलेला आहे. सिक्सर. अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला. हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आपला लढा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. हिंदुत्वाच्या विचाराचा आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘शिवसेनेचा विचार तिथे शिवसैनिक. म्हणून या सहा खासदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. काही लोकं मीडियावर काही उलट सुलट चुकीच्या बातम्या आरोप प्रत्यारोप करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो, मी सर्वांचा मान सन्मान राखेल, तुमच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवेल, आपण कुटुंब म्हणून पुढची वाटचाल करू. खासदारांसाठी मोठी घोषणा करताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘आपण मंत्र्यांसोबत तुमची बैठक लावू. तुमचे प्रश्न सोडवू. केंद्राशी निगडीत प्रश्नही सोडवू. कुठेही काही अडचण येणार नाही. आपल्याला सर्वांना मिळून शिवसेना अधिक मजबूत करायची आहे. वाढवायची आहे. घराघरात पोहोचवायची आहे. आपलं सर्वांचं सहकार्य आणि ताकद एकत्र आल्यावर शिवसेना अधिक भक्कम होईल.




