प्रगतीच्या क्षितिजावर चमकणारे ‘तेजस्वी व्यक्तिमत्व’-तेजस्विनी भिलारे
पाचगणी प्रतिनिधी- महाबळेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते कै. बाळासाहेब भिलारे दादा यांचे चिरंजीव जतीन भिलारे यांच्या सौभाग्यवती डॉ.तेजस्विनी भिलारे नावाप्रमाणे कर्तृत्व गाजवणारे तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची ओळख महाबळेश्वर तालुक्यांसह महाराष्ट्रात आहे. ध्येयप्राप्ती व यशाचे क्षितिज गाठण्यासाठी कष्ट करणे, प्रयत्नात सातत्य राखणे व आत्मविश्वास भरून आपल्या कामात आपल्याला वाहून घेणे या सर्व सद्गुणांचा एक संगम या व्यक्तिमत्वामध्ये पाहावयास मिळतो. डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे. त्यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याविषयी…
तेजस्विनी भिलारे याचे प्राथमिक, माध्यमिक व कॉलेजचे शिक्षण त्यांनी नगरमध्ये पूर्ण केले. त्यांच्या वडीलांनी डेप्युटी कमिशनर तर आजोबांनी डेप्युटी कलेक्टर अशा पदांवर काम केलेले. आजोबा व वडील यांच्याबरोबर त्यांचं लहानपण गेलं. घरामध्ये अध्यात्माचे व प्रशासनाचे बाळकडू मिळाल्यामुळे व्यवस्थापन कसं करायचं हे बालपणापासूनच त्यांच्या स्वभावामध्ये उतरले. नंतर जतीन भिलारे यांच्याशी विवाह झाल्यानंतर हिलरेंज एज्युकेशन परिवारामध्ये त्यांनी प्रवेश केला. सहशिक्षिका या पदावरून त्यांनी सुरुवा केली व आज त्या संस्थेच्या संचालिका म्हणून कार्य करत आहेत.
शाळेचा कारभार जतीन भिलारे व तेजस्विनी भिलारे या दोघांनी ज्यावेळी हातामध्ये घेतला. त्यावेळी शाळेची विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होती. मात्र, त्यांनी हा कारभार हाती घेतला तेव्हापासून शाळेची प्रगती गतीने होऊ लागली आहे. पाचगणी व महाबळेश्वर परिसरामध्ये सर्वात कमी फी घेऊन उच्च दर्जाचे शिक्षण देणारे एक शैक्षणिक संकुल त्यांनी उभं केलं. आज या संकुलामध्ये खेडेपाड्यातील गोरगरिबांची मुलेमुली शिक्षण घेत आहेत. खास करून विद्यार्थिनींना या शिक्षणाचा फायदा होऊन त्यांचे भविष्य उज्वल घडविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर मूकबधीर, अंध, अपंग व्यक्तींना आर्थिक मदत करणे, कष्टकरी महिलांना हातभार लावणे, महिलांना रोजगार देणे, कर्करोगासंदर्भात जनजागृती करणे अशा अनेक कार्यामध्ये त्या सहभाग घेतात. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांना आजअखेर चौदा पुरस्कार मिळाले आहेत. लाइफ स्टाइल व पॉवर ऑफ हर मॅगझिनसारख्या मासिकानेही त्यांची दखल घेतली आहे. त्याचबरोबर सेलिब्रिटी क्लब ऑफ इंडिया या संस्थेनेही त्यांना आपल्या संस्थेत सदस्य म्हणून सहभागी करून घेतले आहे.
फ्रान्स युनिव्हर्सिटीकडून स्कूल मॅनेजमेंटमध्ये डॉक्टरेट (पीएच. डी) पदवी आज त्यांना बहाल करण्यात आली आहे. अमेरिकन असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल सायंटिस्ट ऑर्गनायझेशन (यूएसए) यांनीही यांना आमंत्रित केले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी भिलार या ठिकाणी कै. बाळासाहेब भिलारे अकॅडमी सुरू केली. या अकॅडमीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी न जाता त्याच्यासाठी स्थानिक पातळीवर भिलारचे हे पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केद्र उपलब्द करुनदिले आहे. येथे तज्ज्ञ व्यक्तींकडून याबाबत मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्लासेस करण्यापेक्षा भिलारमध्येच मार्गदर्शन केंद्र उभे राहिले आहे व आजूबाजूच्या गावातील मुलांना उच्च माध्यमिक शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केला आहे. भिलारमध्ये त्यांनी विज्ञान शाखेच्या अकरावी व बारावीत विषयाचे वर्ग सुरू करण्याचा निर्धार केला आहे.
पुस्तकाचे गाव तयार होत असताना ज्येष्ठ नेते कै. बाळासाहेब भिलारे (दादा) यांच्याबरोबर यांनीही चांगला सहभाग घेतला व हे गाव पुस्तकात गाव जाहीर करण्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे. घरामध्ये सासू निर्मलाताई, दीर नितीन भिलारे, जाऊबाई तेजस्विनी भिलारे, पती जतीन भिलारे, आई शोभा काकडे यांचा तेजस्विनी भिलारे यांच्या सामाजिक कार्यासाठी पाठिंबा असतो. या पाठिंबाच्या आधारावरच महाबळेश्वर तालुक्यामधील हे व्यक्तिमत्व भविष्यातील विकासासाठी उदयास येत आहे. या तेजस्वी व्यक्तिमत्वास आपले स्वप्न व आपल्या ध्येय प्राप्त करण्यासाठी आपणाकडून अजून प्रयत्न व्हावेत व आपले ध्येय आपणास प्राप्त व्हावे, हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!




