तापोळ्यातील ‘विहंगम गॅलरी’ला ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव द्या; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी
महाबळेश्वर-महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथे प्रस्तावित असलेल्या ‘विहंगम गॅलरी’ला हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय देशपांडे यांना पक्षाच्या वतीने अधिकृत निवेदन देण्यात आले.
तापोळा येथे प्रस्तावित असलेला पूल आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून, याच ठिकाणी एक विहंगम गॅलरी (व्ह्यू पॉइंट) उभारण्यात येणार आहे. जागतिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जतनासाठी या गॅलरीला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
अपघात रोखण्यासाठी रस्त्यांवर ‘रिफ्लेक्टर’ लावण्याची मागणी
याच निवेदनात महाबळेश्वरच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टी आणि धुक्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या वाहनांचे अपघात टाळण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महाबळेश्वर-केळघर घाट, महाबळेश्वर-पाचगणी आणि महाबळेश्वर-प्रतापगड या मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तातडीने ‘रिफ्लेक्टर’ बसवण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणीही शहर शिवसेना गटाने केली आहे.
हे निवेदन देताना शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, उपशहर प्रमुख राजेश साळवी, युवा सेना शहर प्रमुख आकाश साळुंखे, शहानवाज भाई खारखंडे, आसिफ भाई महापुळे, अली भाई वारुणकर, तेजस बोधले, राहुल खरे यांच्यासह अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवेदनानंतर संबंधित विभाग यावर काय कार्यवाही करतो, याकडे आता महाबळेश्वरकरांचे लक्ष लागले आहे.




