तापोळा विभागातील समस्यांवरून जनआक्रोश: ९ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
महाबळेश्वर: जावळी-महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांचा समावेश असलेल्या तापोळा विभागात निकृष्ट दर्जाची विकासकामे, अधिकारी-ठेकेदारांची दिरंगाई आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याविरोधात १०५ गाव सामाजिक संघटना पदाधिकारी आणि समाज बांधवांनी येत्या ९ ऑगस्ट रोजी ‘क्रांतीदिनी’ वाघेरा येथे रास्ता रोको आणि जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सार्वजनीक बांधकाम विभाग अंतर्गत कोटटयावधी रुपयांची सार्वजनीक विकासाची कामे घेवून ती अयोग्य निकृष्ट दजीची करनार्या ठेकेदारांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याची आणि केलेल्या कामांची त्रयस्थ समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी साताऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या विभागातील कामांची दुरवस्था:
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा .एकनाथ शिंदे याच विभागातील मुळ रहिवासी असून त्यांच्या पुढाकाराने अनेक विकासकामे सुरू झाली असली तरी काही कामांमध्ये गंभीर दिरंगाई आणि अनियमितता व निकृष्ट दर्जाची कामे केली असल्याची दिसून येत आहेत . महाबळेश्वर – तापोळा रस्त्याचे रुंदीकरण आणि नूतनीकरणाचे काम उपमुख्यमंत्र्यांनी विभागाला दिलेली मोठी भेट मानली जात असल्याची भागात जरी चर्चा होत असली तरी यंदाचे पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी नवीन केलेला रस्ता खचला असून , भेगा पडल्या होत्या तसेच संरक्षक भिंती ( रिटेनिंग वॉल ) कोसळल्या आहेत. रस्त्यावर पांढरे पट्टे आणि रिफ्लेक्टर बसवणे बाकी आहे.
स्थानीक सामाजिक कार्यकर्त्यांनी १० फेब्रुवारी २०२५ रोजी शासना कडून केलेल्या विवीध निकृष्ट सार्वजनीक विकास कामांविरोधात उपोषण केले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अहिरे साहेब यांनी कामांची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे .
कोट्यवधी रुपयांच्या कामांची दुर्दशा:
आश्वासनानंतरही कामांची गुणवत्ता सुधारली नाही उलट अनेक ठिकाणी नव्याने झालेली विकास कामेही निकृष्ट दर्जाची असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तापोळा-महाबळेश्वर रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला असून, संरक्षण भिंती आणि मोऱ्या कोसळल्या आहेत. कासरुंड येथील ५ कोटी रुपयांचा नवा आर . सी . सी पूलही अनेक ठिकाणी खचला आहे. रेनोशी ते उचाट बेंद्रे रस्त्याचे डांबर पूर्णपणे उखडले असून, तोही रस्ता पूर्णपणे निकृष्ट झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ठेकेदारांवर कारवाईची मागणी :
कुरोशी ते येरणे रस्त्याचे कामाची वर्क ऑर्डर आणि टेंडर दोन वर्षांपूर्वी होऊनही ठेकेदारांनी कामे सुरू केली नाहीत. याच रस्त्यावर देवसरे गावाजवळ पावसाळ्यापूर्वी सुरू केलेले पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच, दरे तांब ते निवळी रस्त्याचे रुंदीकरण करताना ठेकेदाराने २२ किलोमीटरचा रस्ता खोदून ठेवल्याने महाबळेश्वर, उचाट, सिंधी एस टी सेवा दोन महिन्यांपासून बंद आहे यामुळे सोळा गाव कांदाटी खोऱ्यातील लोकांना दवाखान्यात येणेही अवघड झाले आहे.
मोऱ्यांच्या आर.सी.सी बांधकामांमध्ये दगडांचा वापर केला जात असल्याचा आरोपही निवेदनात आहे. सिमेंटचे प्रमाण कमी वापरले जात असून, पाण्याचा वापरही कमी केला गेला आहे व जात असल्याने कामांचा दर्जा खालावत आहे. शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शासकीय पैशाचा अपव्यय / गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मौजे रेनोशी ते शिरणार रस्त्याच्या मोऱ्या कलंडल्या असून, त्या रस्त्याचे डांबरही उखडले आहे. कुरोशी-लाखवड आणि चिखली-येरणे रस्त्यांचीही तीच अवस्था आहे. तापोळा ते वानवली-अहिरे-वेंगळे रस्त्याचे टेंडर होऊन दोन वर्षे झाली तरी काम सुरू झालेले नाही. तापोळा, कोयना, सोळशी, कांदाटी विभागातील सुमारे ९० टक्के कामे रत्नप्रभा कन्स्ट्रक्शन या एजन्सीने घेतली असून, ती वेळेवर पूर्ण होत नाहीत आणि निकृष्ट दर्जाची आहेत. या एजन्सीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि वीजपुरवठ्याची समस्या:
तापोळा परिसर दुर्गम डोंगरी असल्याने येथे फक्त बी एस एन एल चे टॉवर आहेत पण रेंजची समस्या गंभीर आहे सतत रेंज जात येत असल्याने बँक व्यवहार, शैक्षणिक कामे आणि संपर्क साधणे कठीण झाले आहे. अनेकदा आठ-आठ दिवस रेंज नसते ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. तापोळा येथील मुख्य टॉवर नादुरुस्त असून, बॅटरी बॅकअप नसल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे.
सोळशी तापोळा या परीसरातील गावे कोयना धरणाचे नजीक असूनही परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो . महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी भागात चांगली / योग्य सेवा देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रशासनाला गंभीर दखल घेण्याची विनंती:
भागातील रस्ते दुरुस्ती , अपूर्ण कामे पूर्ण करणे, निकृष्ट कामे थांबवणे, मंजूर कामे तात्काळ सुरू करणे, मोबाइल रेंजची समस्या कायमस्वरूपी संपवणे आणि २४ तास वीज उपलब्ध करणे या मागण्यांकडे शासनाने व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे. विदयुत महावितरण कंपनीने वायरमन आणि लाइनमनची संख्या वाढवावी, बी एस एन एल चे तापोळा येथील कार्यालय सुरू करून कर्मचारी नियुक्त करावेत आणि उत्तेश्वर येथील बंद पडलेला बीएसएनएल टॉवर तातडीने दुरुस्त करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
गेल्या एक वर्षापासून तापोळा कोयना सोळशी डोंगरी भागातील समाजबांधव या समस्यांवर आंदोलन करत असूनही कोणताही मार्ग निघत नसल्याने अखेर ९ ऑगस्ट रोजीच्या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा तापोळा कोयना सोळशी भागातील गावकरी नागरीकांन कडून देण्यात आला आहे.
