अखिल भारतीय विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत स्वप्ना चव्हाणला कांस्यपदक; साताऱ्यात सत्कार
सातारा (प्रतिनिधी) : सदगुरू सेवालाल फाउंडेशन तर्फे कु. स्वप्ना सीता खिरू चव्हाण हिचा सत्कार करण्यात आला. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे आयोजित अखिल भारतीय विद्यापीठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत स्वप्नाने कांस्यपदक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या यशाबद्दल फाउंडेशनचे माजी अध्यक्ष श्री. बसवराज शंकर चव्हाण व सचिव श्री. राजू सोमनाथ चव्हाण यांच्या हस्ते स्वप्नाचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन राठोड, उपाध्यक्ष श्री. नामदेव जाधव, खजिनदार श्री. कृष्णा राठोड, श्री. बाबुराव पवार, किसन नाईक, शहराध्यक्ष श्री. पुंडलिक राठोड, म्हसवे तांड्याचे नायक श्री. रमेश राठोड, ज्येष्ठ सल्लागार श्री. महादू चित्तू चव्हाण, देवबा राठोड, श्री. रामू देशमुख चव्हाण, सौ. रेणुका राठोड तसेच नॅशनल कुस्तीपटू कु. शर्वरी कृष्णा राठोड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वप्नाचा प्रवास अत्यंत खडतर असून मर्यादित आर्थिक परिस्थितीतही कोणतीही बाह्य आर्थिक मदत न घेता केवळ गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली तिने बॉक्सिंगसारख्या खर्चिक खेळात यश मिळवले आहे. तिच्या जिद्दीने व आई-वडिलांच्या पाठबळामुळे ती आज या उंचीवर पोहोचली आहे.
तिच्या या यशामुळे बंजारा समाजासह देशातील सर्व खेळाडूं समोर एक आदर्श निर्माण झाला आहे. येत्या काळात स्वप्ना सुवर्णपदक पटकावेल, असा विश्वास व्यक्त करत फाउंडेशनतर्फे तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




