सुरेश वाडकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे हे उपक्रम प्रेरणादायी आहेत-ज्ञानदेव रांजणे
केळघर, ता:६:प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत आई-वडिलांचे योगदान महत्वाचे आहे. आई वडिलांनि आपल्याला घडवण्यासाठी फार मोठा त्याग केलेला असतो. कुरुळोशी येथील युवा उद्योजक सुरेश वाडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उद्योग क्षेत्रांत घेतलेली गरुडझेप युवकांना आदर्शवत असून वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त त्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवली असून विविध सामाजिक उपक्रमातून सुरेश वाडकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे हे उपक्रम प्रेरणादायी आहेत. असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले.
कुरुळोशी येथील युवा उद्योजक सुरेश वाडकर यांचे वडील कै. कोंडीबा वाडकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कुरुळोशी येथे आयोजित कार्यक्रमात रांजणे बोलत होते. यावेळी मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे,जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक रामभाऊ शेलार, ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे,बबनराव बेलोशे,शंकर जांभळे, जगन्नाथ वाडकर, दादाजी जांभळे,रवींद्र सल्लक,रमेश वाडकर, मधुकर पडगळ,बबन शिंदे, अंकुश बेलोशे, दत्ता बेलोशे, करण आखाडे, प्रशांत जुनघरे,योगेश शेलार आदींची उपस्थिती होती.सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील म्हणाले, समाजातील भावी पिढी आदर्शवत घडवण्यासाठी दातृत्वातून युवा उद्योजक सुरेश वाडकर यांनी वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी राबवलेला उपक्रम प्रशंसनीय आहे. एकनाथ ओंबळे म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत स्वतः ला घडवून अल्पावधीतच यशस्वी उद्योजक म्हणून वाडकर यांनी ख्याती मिळवली आहे.रामभाऊ शेलार म्हणाले, युवा उद्योजक सुरेश वाडकर हे विविध सामाजिक उपक्रमांतून नेहमीच योगदान देतात. पदरमोड करून सढळ हाताने ते मदत करत असतात.
याप्रसंगी कोंडीबा वाडकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कुरळोशी शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरेश वाडकर यांनी स्वागत केले. रवींद्र सल्लक यांनी आभार मानले. या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
