मायग्रेनची (अर्धशिशी)डोकेदुखी !
डोकेदुखीची अनेक कारणे असतात. त्यामध्ये मायग्रेन किंवा पित्ताची डोकेदुखी ही सर्वसाधारण आहेत. बऱ्याच लोकांना याचा त्रास वारंवार होत असतो. महिलांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येते. काहीजणांना महिन्यातून एखाद्या वेळेस तर काहींना आठवड्यातून दोन-तीन वेळा सुद्धा ही डोकेदुखी होऊ शकते. डोकेदुखीच्या आजारामध्ये 52% रुग्ण हे अर्धशिशीच्या डोकेदुखीने त्रस्त असतात. मायग्रेन हा एक न्यूरोलॉजिकल डीसऑर्डर असून मायग्रेनच्या अटॅक मध्ये डोक्याच्या एका बाजूला तीव्र अशा धडधडणाऱ्या वेदना होत असतात. त्याचबरोबर पित्त होणे, उलटी आल्यासारखे वाटणे व उलटी झाल्यावर थोडेसे बरे वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी बरोबरच या रुग्णांना आवाज व प्रकाशही सहन होत नाही. त्यामुळे ते रुग्ण अशावेळी शांत जागेत अंधाऱ्या खोलीत विश्रांती घेणे पसंत करतात. ज्यावेळी रुग्णांना मायग्रेन अटॅक येतो त्यावेळी त्यांच्यामध्ये खूपच चिडचिड होताना दिसून येते.
मायग्रेनची कारणे
ताण व ताण तणाव, रात्री झालेले जागरण, जेवणाच्या अनियमित वेळा तसेच जेवणामध्ये चीज, चॉकलेट, कॉफी थंड पदार्थ किंवा चायनीज फूड अशा पदार्थांचे सेवन करणे, अल्कोहोलचे सेवन करणे, उन्हामध्ये काम करणे, महिलांमध्ये होणारा हार्मोनल बदल ही अर्धशिशीची कारणे आहेत.
‘मायग्रेन’ची लक्षणे
तीव्र डोकेदुखी, मळमळणे व उलटी होणे, प्रकाश नकोसा वाटणे, आवाज नकोसा वाटणे, थकवा व अशक्तपणा येणे, केव्हा केव्हा मान मानेची पूर्ण एक बाजू दुखत असते किंवा मान कडक झाल्याचे जाणवते. कोणत्याही वस्तूवर आपली दृष्टी केंद्रित होण्यास अडथळा येतो.
मायग्रेन चे प्रकार
मायग्रेन विथ : यामध्ये डोकेदुखी सुरू होण्याच्या अगोदर डोळ्यापुढे अंधारी येते. डोळ्यापुढे तारका येणे अशी लक्षणे दिसून येतात. यानंतर साधारणपणे एक तासानंतर डोकेदुखी सुरू होते.
वेस्टीब्युलर : यामध्ये डोकेदुखी बरोबरच चक्कर ही येते.
हेमीप्लेनिक मायग्रेन : या प्रकारच्या मायग्रेन मध्ये डोकेदुखी सुरू होण्याबरोबरच शरीराच्या एका बाजूला तात्पुरत्या स्वरूपाचा अशक्तपणा (अर्धांगवायू) ही येऊ शकतो. या अशक्तपणा मध्ये लागलीच सुधारणाही होते.
मासिक पाळीतील मायग्रेन : हा मायग्रेन स्त्रियांना प्रामुख्याने त्यांच्या मासिक पाळीच्या वेळी होतो.
रेटीनल मायग्रेन : हा मायग्रेनचा दुर्मिळ प्रकार असून यामध्ये तात्पुरती दृष्टी कमी होते आणि डोळ्यात तात्पुरते अंधत्व येते.
रुग्णांनी हे टाळावे
तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर च्या गोळ्या घेऊ नयेत. या गोळ्या आठवड्यामध्ये दोन-तीन पेक्षा जास्त घेतल्यास दररोज डोकेदुखी होऊ शकते. आपल्याला उचमळते आहे/ पित्त झाले आहे. त्यामुळे गॅस्ट्रोस्कोपी किंवा पोटाची औषधे घेऊ नयेत. डोके पूर्णपणे व खूप दुखत असल्यास आणि ही डोकेदुखी दोन-तीन दिवसापेक्षा अधिक काळ राहिल्यास पेन किलरच्या गोळ्या खात न बसता तातडीने जवळच्या मेंदू रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
जीवनशैलीत हे बदल करा
अर्धशिशी डोकेदुखीच्या रुग्णांनी दररोज आठ तास व्यवस्थित शांत झोप घ्यावी.
सकाळी फिरण्याचा तसेच योगा सारखे व्यायाम नियमितपणे करावेत.
शक्यतो उन्हात जाणे टाळावे.
गरजेचेच असल्यास डोक्यावर टोपी/ रुमाल ठेवावा.
विचार तणाव व चिडचिड यापासून मुक्त राहावे
आपल्या जेवणाच्या वेळा नियमित ठेवणे गरजेचे असून अशा रुग्णांनी उपवास शक्यतो टाळावा
रुग्णांनी अल्कोहोल, कॉफी, चीज, चॉकलेट, थंड पदार्थ, थंडपेय हे टाळावे. कारण या अन्नामध्ये असलेले monosodum glutamate हा घटक डोकेदुखीस कारणीभूत असतो.
सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदू विकार तज्ज्ञ (न्यूरो फिजिशियन) डॉ. महाबल शहा हे दर बुधवारी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी करून उपचार देतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9168432432 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
