राज्यात जावळी तालुका हा विकासकामांच्या बाबतीत अग्रेसर राहण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार-मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
केळघर, ता:९:जावळी तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. केळघर विभागासाठी महत्त्वाच्या असलेल्या बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून बांधकाम मंत्री पदाच्या माध्यमातून जावळी तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी काम करत असून राज्यात जावळी तालुका हा विकासकामांच्या बाबतीत अग्रेसर राहण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
येथील प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी संचालक शंकरराव जांभळे व माजी सरपंच सुनील जांभळे यांच्या मातोश्री कै. पार्वती जांभळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर धनावडे,शंकरराव जांभळे, सुनील जांभळे,अंकुश बेलोशे, सचिन बिरामणे , अजय जांभळे,अभिषेक जांभळे,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.मंत्री भोसले म्हणाले, मी गेल्या १६ वर्षापासून तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहे. सामान्य जनतेने मला वेळोवेळी ताकद दिली असून तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चित पाठपुरावा करणार आहे. जांभळे कुटूंबियांनी आपल्या आईच्या स्मृती चिरंतर राहण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले आहेत.जांभळे परिवाराचे हे उपक्रम आदर्शवत आहेत. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी विविध समस्यांची माहिती मंत्री भोसले यांना दिली. तात्काळ दूरध्वनी वरून अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले.शंकरराव जांभळे यांनी स्वागत केले. सुनील जांभळे यांनी आभार मानले.
