सामाजिक बांधिलकी व राष्ट्रभक्ती ही अण्णाभाऊ यांच्या लेखनाची प्रेरणा-शाहीर भानुदास गायकवाड
सातारा प्रतिनिधी- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ मनोरंजनासाठी निर्माण झालेले नसून प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेतील उपेक्षित, वंचित समाज घटकांच्या वेदना विद्रोहाचे वास्तव चित्रण करण्यासाठी त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या कविता, शाहिरी गीतांमध्ये सामाजिक बांधिलकी व राष्ट्रभक्ती ही त्यांच्या लेखनाची प्रेरणा आहे.” असे प्रतिपादन शाहीर भानुदास गायकवाड यांनी केले आहे.
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग व अजिंक्यतारा मराठी भाषा प्रसार युवक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्ताने ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रकट होणारी जाणीव’ या विषयावर परिसंवाद व अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या शाहिरी, काव्य गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध शाहीर भानुदास गायकवाड यांचे हस्ते व शाहीर विठ्ठल खंडझोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत व परिचय मराठी विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी ओजस देवताळे यांने विशेष कामगिरी केल्याबद्दल त्याचे मराठी विभागाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भानुदास गायकवाड पुढे म्हणाले की, ” पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर आधारलेली नसून ती जगातील श्रमिकांच्या तळहातावर आधारलेली आहे असे अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले होते. भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्याचा अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर मोठा प्रभाव होता. समाज व्यवस्थेतील उपेक्षित वंचित समाज घटकांना सामाजिक न्याय मिळावा म्हणून अण्णा भाऊ साठे यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत साहित्य लेखन व कला आविष्काराच्या माध्यमातून संघर्ष केला. युवकांनी सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.”असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
शाहीर भानुदास गायकवाड यांनी विद्यार्थी रसिकांसमोर
‘ साहित्य सूर्य उगवला वाटेगावच्या भूमीत, वारणेचा हा वाघ गर्जला साहित्याच्या विश्वात’, ‘ माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतेय काहिली’, ‘ समतेची स्वातंत्र्याची न्यायाची स्वतंत्र भारत देशाची घटना बाबासाहेबांची,’ अशा उल्लेखनीय गीतांबरोबरच विविध प्रेरणादायक देशभक्तीपर स्फूर्तीदायक गीते सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. शाहीर विठ्ठल खंडझोडे यांनी अण्णा भाऊ साठे लिखित ‘ मुंबईची लावणी’ प्रभावीपणे सादर केली. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विद्या नावडकर व कु. त्रिशाली शिंदे यांनी उत्कृष्टपणे केले.
‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रकट होणारी जाणीव’ या विषयावरील परिसंवाद कार्यक्रमांमध्ये मोहिनी शिंदे अनिकेत पडगे, माधवी जगदाळे, प्रथमेश बाबर, श्रावस्ती माने, अनुजा शिंदे, सुजित काळंगे, रसिका साळुंखे, ओम सपकाळ इत्यादी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी अण्णाभाऊ साठे यांच्या विविध साहित्य प्रकारावर समीक्षात्मक विवेचन करून परिसंवाद कार्यक्रमांमध्ये वैचारिक सहभाग घेतला. परिसंवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजयकुमार सरगडे यांनी केले. तर अनिकेत पडगे यांनी आभार व्यक्त केले.
सदर परिश्रम सदर परिसंवाद कार्यक्रमात डॉ. केशव पवार, प्रा. प्रियंका कुंभार, डॉ. समीक्षा कदम, प्रा. श्रीकांत भोकरे, डॉ. महादेव चिंधे,डॉ. ऋषिकेश काळे, प्रा. साळुंखे व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.





