भक्तिरसात न्हाऊन निघाला श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा हजारो भाविकांनी घेतले दर्शन, टाळ मृदंगाच्या तालावर शहरात मिरवणूक
सातारा : अक्कलकोटचे परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांनी अक्कलकोट राजघराण्याचे तत्कालीन नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना प्रेमाचे प्रतीक म्हणून प्रदान केलेल्या पवित्र पादुकांचा दर्शन सोहळा आज साताऱ्यात दाखल झाला. या अलौकिक सोहळ्याने सातारा शहर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. या ऐतिहासिक पादुकांच्या दर्शनासाठी सकाळी अदालतवाड्यात राजघराण्याकडून विधिवत पूजन झाल्यानंतर, दुपारी शाहू क्रीडा संकुलाजवळ लॅन्ड मार्क टॉवर येथे भाविकांसाठी त्या विधिवत विराजमान करण्यात आल्या. हजारो भाविकांनी दर्शन घेतले
श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट व मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांच्या पुढाकाराने आयोजित सोहळ्याच्या नियोजनानुसार, पवित्र पादुकांचे आगमन होताच बांधकाम व्यवसायिक श्रीधर कंग्राळकर यांच्यासह सातारकर स्वामी भक्तांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले. सर्वप्रथम सातारा येथील राजघराण्यातील वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर, पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांच्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन, मंगल कलश आणि भगवे ध्वज घेऊन निघालेल्या भव्य मिरवणुकीने साताऱ्यातील प्रमुख मार्गांवरून प्रदक्षिणा केली. या मिरवणुकीत शेकडो स्वामीभक्त, दिंडीकरी आणि टाळ मृदंगाच्या पथके सहभागी झाले होते. ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ या नामघोषाने सातारचे वातावरण भारावले होते. यावेळी मालोजीराजे भोसले, जयप्रभादेवीराजे भोसले, सयाजीराजे भोसले, अक्कलकोट राजकारणाचे पुजारी पवन कुलकर्णी सहभागी झाले होते.
दुपारपासून रात्री उशिरापर्यंत पादुका दर्शनासाठी खुल्या ठेवण्यात आल्या होत्या. स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी दर्शनस्थळी मोठ्या रांगा लावल्या होत्या. वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. प्रत्येक भाविक अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने स्वामींच्या या कृपा-पादुकांचे दर्शन घेत होता. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते, तर काही जण पादुकांना स्पर्श करून मनोभावे प्रार्थना करत होते. हा क्षण साताऱ्यातील स्वामी भक्तांसाठी एक अमोल ठेवा आणि आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरला.
पादुकांचा उद्देश आणि नियोजन मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तृतीय) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या पादुका दर्शन सोहळ्यामुळे स्वामी समर्थांचा संदेश महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांपर्यंत पोहोचणार आहे. या दर्शनामुळे स्वामींच्या कृपेचा आशीर्वाद सर्वत्र प्रसारित होत आहे, अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजक बांधकाम व्यवसायिक श्रीधर कंग्राळकर, आशिष कदम, अँड प्रतीक तावरे, निमिष कदम, ओंकार राजेभोसले, सम्राट साळुंखे, धनेश खुडे, महेश चव्हाण, प्रीतम कणसे, राहुल कदम आणि स्वामी भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. या अखंड पादुकांचे दर्शन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर धार्मिक वातावरण निर्माण होऊन एक वेगळी ऊर्जा संचारली. त्यानंतर रात्री उशिरा सोहळा फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाला. त्यानंतर मिरज, सांगली, मुधोल, पोण्डा, पणजी, सावंतवाडी, कागल, कोल्हापूर, भोर, पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे आणि डोंबिवली आदी ठिकाणी भाविकांना कृपापादुकांचे दिव्य दर्शन घेण्याची अद्वितीय योग उपलब्ध होणार आहे.
या पवित्र कार्यासोबतच अजून एक कार्य श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे पार पाडू इच्छित आहे. ते म्हणजे स्वामीभक्तांच्या सेवेसाठी ‘अनुभूती’ या नावाचा एक भव्य प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे. या प्रकल्पांतर्गत श्री स्वामी समर्थांची १०८ फूट भव्य दिव्य मूर्ती, ध्यान केंद्र, चिकित्सालय, उद्यान, भक्तनिवास आदी अशा मूलभूत आणि पूरक सुविधांच्या विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अनेकांनी देणगी स्वरूपात योगदान दिले.




