जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्था यांचे संयुक्त विद्यमाने साताऱ्यात १०, ११ व १२ जानेवारीस ‘शोध मराठी मनाचा’ जागतिक संमेलन
मा. खासदार शरद पवार यांचे हस्ते उदघाटन, अध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे
प्रमुख अतिथी मा. ना. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले व मा. ना. आशिष शेलार
हणमंतराव गायकवाड यांना अकादमीचा जागतिक मराठी भूषण पुरस्कार ,
राजीव खांडेकर यांना वि. वा. ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट वसईचा जागतिक मराठी गौरव पुरस्कार
१२ जानेवारीस समारोप समारंभास छत्रपती उदयनराजे भोसले व नागराज मंजुळे हे उपस्थित राहणार
सातारा :- येथील रयत शिक्षण संस्था व जागतिक मराठी अकादमी या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १० जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या तीन दिवशी ‘शोध मराठी मनाचा ‘या २० व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन छत्रपती शिवाजी कॉलेज ,सातारा येथे करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता या संमेलनाचे उदघाटन, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खा.शरद पवार यांचे हस्ते होणार आहे हे संमेलन महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह .साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून मा. ना. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, मा.ना.आशिष शेलार हे मान्यवर उपस्थित राहणार असून मा. श्रीनिवास पाटील,लोकनेते रामशेठ ठाकूर मा.आमदार विश्वजीत कदम ,मा.दत्तप्रसाद दाभोलकर यावेळी उपस्थित राहतील. यावेळी हणमंतराव गायकवाड यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार व राजीव खांडेकर याना जागतिक मराठी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच जपानहून योगी पुराणिक व अमेरिका येथून श्री.ठाणेदार यांचे व्हीडीओद्वारे संदेश प्रसारित केले जाणार आहेत. या संमेलनास चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, उद्योग, कृषी, शिक्षण व आरोग्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे परदेशातील मराठी व भारतीय मान्यवर सहभागी होत असल्याची माहिती जागतिक संमेलनाचे निमंत्रक व स्वागताध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी व जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘शोध मराठी मनाचा २०२५’ जागतिक संमेलनातील तीन दिवसाच्या विविध कार्यक्रमाच्याविषयी सविस्तर माहिती देताना ते पुढे म्हणाले की शुक्रवार १० जानेवारी रोजी दुपारी ०१.३० ते ०२.३० वाजता या कालावधीत रयत शिक्षण संस्थेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत व प्रा.संभाजी पाटील प्रस्तुंत असा कर्मवीर भाऊराव पाटील चरित्र आशयावर आधारित ‘गीत गंधाली’ कार्यक्रम होणार आहे. दुपारी ०२.३० ते ०३.३० या वेळेत ‘लक्ष्मीची पाऊले‘या कार्यक्रमात उद्योगक्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती हणमंतराव गायकवाड ,फारूक कुपर व रामदास माने यांची मुलाखत घेतली जाणार आहे. तर दुपारी ३.३० वाजता ‘समुद्रापलीकडे ‘या कार्यक्रमात परदेशस्थित कर्तृत्ववान मराठी व भारतीय व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या जातील.अमेरिकेतील गिरीश ठकार, प्राजक्ता वझे, अनिल नेरूरकर, प्रसाद वझे, आस्ट्रेलिया येथील नॅप अल्मेडा, मिहीर शिंदे, दुबईतील सचिन जोशी इत्यादी मान्यवर यांची मुलाखत घेतली जाणार आहे.
शनिवारी ११ जानेवारीस सकाळी ९.३० वाजता ‘मुक्काम पोस्ट सातारा’ या कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील मराठी कलावंत अभिनेते सयाजी शिंदे, किरण माने व संतोष पाटील व इतर कलावंत इत्यादींच्या मुलाखती होतील. सकाळी ११ वाजता‘आकाशाशी जडले नाते’या कार्यक्रमात खर्डा -अहिल्यानगर येथील वैमानिक नीलम इंगळे व अमेरिकेतील अमोल केळकर यांच्या मुलाखती होतील. दुपारी १२ वाजता ‘अभिजात मराठी आणि माध्यमे’ या विषयावरील परिसंवादात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, डॉ.पी.डी पाटील (पिंपरी), नितीन ठाकरे (नाशिक) ,जगन्नाथ पाटील (बंगलोर), मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकात दळवी इत्यादी सहभागी होतील. दुपारी ३ वाजता ’आधारवड’ या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाज कार्यकर्ते डॉ. भरत केळकर (नाशिक), गिरीश कुलकर्णी (अहिल्यानगर) व लंडन येथील डॉ.विश्वास सापत्नेकर इत्यादींच्या मुलाखती होतील.
११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ‘चित्र -शिल्प -काव्य या कार्यक्रमात शिल्पकार मंदार लोहार (सातारा), चित्रकार सचिन खरात (सोलापूर), कवी फ. मु. शिंदे (संभाजी नगर), अशोक नायगावकर (वाई), विठ्ठल वाघ (अकोला) विजय चोरमारे (कोल्हापूर), नितीन देशमुख (चांदूर बाजार), मीनाक्षी पाटील (मुंबई), अंजली कुलकर्णी (पुणे), लता ऐवळे (सांगली), वैशाली पतंगे (कुंभारगाव), अमेरिकेतील भूषण कुलकर्णी, प्रसन्न शानभाग, श्रद्धा भट, योगेश नेर, कॅनडा येथील समीर जिरांकलगीकर इत्यादी सहभागी होतील. या कार्यक्रमात तिन्ही कलांचा सुंदर आविष्कार एकत्रित होत असल्याने त्याचे वेगळेपण भावणारे असेल.
रविवारी १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता‘कृत्रिम बुद्धिमता व सायबर सुरक्षा’ या कार्यक्रमात विवेक सावंत (पुणे), मंगेश आमले (मुंबई) व अमेरिकेचे रवींद्र होवाळीकर (अमेरिका) हे सहभागी होतील. सकाळी ११ वाजता ‘रुपया व बीटकॉईन’ या कार्यक्रमात अर्थ विचारावर विद्याधर अनास्कर (पुणे) व जयंत साळगावकर (मुंबई), निरज हातेकर (वाई) यांच्या मुलाखती होतील. १२ जानेवारीस दुपारी समारोप समारंभास प्रमुख अतिथी म्हणून संसद सदस्य मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व मराठी चित्रपट दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे हे उपस्थित राहणार आहेत. या शिवाय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व मंत्री यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेले असून त्यांच्या उपस्थितीनुसार कार्यक्रमात थोडाफार बदल होण्याची शक्यता असल्याचे संमेलन निमंत्रक जागतिक मराठी अकादमी अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी सांगितले. या संमेलनासाठी कार्यक्रम स्थळी ३५०० इतक्या खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या संमेलनात परिसरातील नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी सहभागी होऊन विविध विषयावरील ज्ञान, माहिती, व प्रेरणा घ्यावी असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकात दळवी यांनी यावेळी केले आहे.