मुथा फाउंडेशनच्या मूल्यवर्धन उपक्रमातून मुलांना मूल्यांसह श्रमसंस्कारांची शिदोरी
सातारा – शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या मूल्यवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची जडणघडण घडविण्याचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. या उपक्रमातून मुलांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास, सखोल समज, वयानुरूप आचरण, सामाजिक व भावनिक कौशल्यवृद्धी तसेच चिकित्सक विचारातून निर्णयक्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. यामुळे मुले भविष्यात जबाबदार व संवेदनशील नागरिक घडावीत, या उद्देशाने शाळा स्तरावर नियमित काम सुरू आहे.
याच उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा, डेरेवाडी येथील शिक्षक अतुल बोराटे सर यांनी मूल्यवर्धन प्रकल्पाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण घेतल्यानंतर इतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य केले. त्यातूनच त्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळेत परसबाग फुलविण्याचा अभिनव निर्णय घेतला.
शाळेतील मुलांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या दैनंदिन आहारात वापरता याव्यात, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांच्या सामूहिक विचारातून परसबागेत मुळा, गाजर, मिरची, वांगी, फुलकोबी, पावटा आदी भाज्यांची लागवड करण्यात आली. मुलांना गटात काम देत कोणती झाडे कोण सांभाळणार, पाणी कसे द्यायचे याचे नियोजनही मुलांनीच केले.
आज ही परसबाग उत्तमरीत्या बहरली असून, आपल्या मुलांनी लावलेल्या भाज्या खाऊन पालकही आनंद व्यक्त करत आहेत. काही पालक तर स्वतःहून मुलांसोबत परसबागेच्या कामात सहभागी होत आहेत. मूल्यवर्धन उपक्रमामुळे मुलांमध्ये आदरभाव वाढला असून, लहान मुलांना “दादा” म्हणून संबोधण्याची सवय लागली आहे.
या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उपक्रमासाठी सुनीता कामठे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व मूल्यवर्धन तालुका समन्वयक श्वेता भिलारे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.



