चऱ्होली येथे स्कूल बस नदीत कोसळताना बचावली; 70 विद्यार्थी सुखरूप!
चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूलबस इंद्रायणी नदीवरील कठडा तोडून पुढे गेली. सुदैवाने बस नदीत कोसळली नाही. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ४) आळंदी – मरकळ रोडवरील दाभाडे सरकार चौकात घडली.
स्कूल बसची नदीवरील पुलाच्या कठड्याला जोरात धडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास एक खासगी स्कूल बस आळंदी-मरकळ रस्त्याने विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. दरम्यान, चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौकाजवळ इंद्रायणी नदीवरील पुलावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. स्कूल बसने नदीवरील पुलाच्या कठड्याला जोरात धडक दिली. कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर निघाली. यावेळी बसमध्ये सुमारे ७० विद्यार्थी होते. स्थानिकांनी बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर गेली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची स्कूल बस आळंदी-मरकळ रोडने विद्यार्थी घेऊन जात होती. चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौकाजवळ इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. स्कूल बसने नदीवरील पुलाच्या कठड्याला धडक दिली. कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर गेली. यावेळी बस मध्ये ७० विद्यार्थी होते. तुषार दाभाडे, सुशील निगडे, विष्णू तापकीर, संकेत तापकीर, सागर दाभाडे, सुरज दाभाडे, ओंकार भुजबळ, सुनील गावडे यांनी स्कूलबसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. या अपघातामुळे मार्गावर वाहतूक कोंडी झाली.
स्कूलबस क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढली.
माजी महापौर नितीन काळजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्कूलबस क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढली. सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली असून इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. काळ आला होता पण वेळ नाही, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.